दोघांच्या खुनाने शेवगाव हादरले, एक अत्यवस्थ

शेवगाव – शेवगाव शहरातील निर्जन ठिकाणी दोघा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी (दि.17) सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आखेगाव रस्त्यालगत विखे मेडिकल कॉलेजपासून जवळच एका खळग्यात महिला व युवकाचा मृतदेह पाहिला. याच ठिकाणी बेशुद्धावस्थेत असलेल्या अन्य एका जखमीस पोलिसांनी तातडीने औषधोपचारासाठी नगर येथील नोबेल रुग्णालयात हलविले. जखमी युवक शुद्धीवर आल्यानंतरच घटनेवर प्रकाश पडणार आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या चौघांच्या हत्याकांडातून शहरवासीय सावरत नाही तोच ही घटना घडली आहे.

दीपक रामनाथ गोर्डे (वय 35, रा. शेवगाव), मंगल अनिल अळकुटे (वय 32, दहिगाने, ता. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. बाळू रमेश केसभट (वय 28, रा. शेवगाव) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. शेवगाव शहराबाहेर हा निर्जन भाग असून येथे सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांनी एका खळग्यात तिघांना पाहिले. त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला तातडीने औषधोपचारासाठी हलविले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, तसेच फॉरेन्सिक पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक संगीता धुमाळ, सुभाष सोनवणे, श्‍वानपथकाचे पी.एस.आवळे, परीविक्षाधीन उपअधीक्षक सोनाली कदम, तान्हाजी बर्डे, गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दिलीप पवार शेवगाव येथे दाखल झाले.

पोलिसांना घटनास्थळावरून दोन मोबाइल, देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, ग्लुकॉन-डी, चप्पल, निरोध व एक स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 12 एपी 4509) आढळून आली. या तिघांचा गळा दाबण्यात आला होता, तसेच डोक्‍यावर कठीण वस्तूने मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या अंगावर मात्र कुठल्याही स्वरूपाच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत.

जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी स्थानिक पोलिसांची बैठक घेत तपासकामी मार्गदर्शन केले. मृत महिलेची आई व कुटुंबीयांकडून मिळणारी माहिती, तसेच मोबाइल कॉलवरून तपासाला दिशा मिळणार आहे. मृत मंगल अळकुटे हिची बहिण अलका एकनाथ धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मंगल अळकुटे या शहरात स्वयंपाक, तसेच इतर मजुरीची कामे करत. रविवारी (दि.16) सायंकाळी स्वयंपाकाच्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. मंगल यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दीपक गोर्डे हा वाहनचालक होता, तसेच बाळू केसभट हा शहरात गवंडी काम करतो. जखमी बाळू केसभट हा शुद्धीवर आल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती मिळेल, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सनी काटे याचा वर्षभरापूर्वी खून
याच ठिकाणी सनी काटे या युवकाचा वर्षभरापूर्वी खून झाला होता. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. शहरातील विद्यानगर येथील हारवणे कुटुंबीयातील चौघांच्या हत्याकांडाला मंगळवारी एक महिना पूर्ण होत आहे. त्या घटनेची दहशत आजही शहरवासीयांत कायम आहे तोच हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)