देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।।

भक्‍तिरसात भाविक न्हाले : पालख्यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

चरण न सोडीं सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ।।
वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम ।।
नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ।।

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आणि पादुका दर्शनासाठी सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीही यावेळी चोख बंदोबस्त ठेवला. पुणे मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजित केले होते. मंगळवारी या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुणे मुक्कामी आल्या. ज्ञानेश्‍वर माउलींचा मुक्काम हा पालखी विठोबा मंदिर तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. या मंदिरांमध्ये पालख्यांच्या स्वागतासाठी आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर भाविकांसाठी खास मंडपसुध्दा उभारण्यात आला. दरम्यान रात्री उशिरा या दोन्ही पालख्या मुक्कामी दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होती. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतुकीला अडथळा येऊ नये, म्हणून या भागातील रस्तेसुध्दा बंद करण्यात आले होते. “साधु संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या उक्‍तीप्रमाणे भवानी पेठ व नाना पेठ परिसरात सोमवारी उत्साहाचे वातावरण होते. हा संपूर्ण परिसरात भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. पालखी मुक्कामी असणाऱ्या मंदिराच्या भोवती भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. याशिवाय परिसरात सगळीकडे विठू माउलीचा गजरही सुरू होता. त्याचबरोबर रात्री वारकऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी भारुड व कीर्तनाचे कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात आले होते.
र्मंगळवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. ज्ञानेश्‍वर माउलींची पालखी ही सासवड तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर मार्गाने जाणार आहे.

पुणेकरांनी केली वारकऱ्यांची सेवा
पुण्यात मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्याच्या सेवेसाठी अनेक संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याचा लाभ अनेक वारकऱ्यांनी घेतला. त्यात अन्नदानापासून वैद्यकीय तपासणी पर्यतचे कार्यक्रमाचा समावेश होता. काही संघटनांनी वारकऱ्यांना पुणे दर्शन ही घडविले.पुण्यात विविध मंदिरे तसेच प्रेक्षणीय स्थळांचा या मध्ये समावेश होता.

वारीदरम्यान पावसाचाही दिलासा
गेल्या आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने वारीच्या दोन्ही दिवशी मात्र विश्रांती घेतली. विशेषत: स्वच्छता आणि नालेसफाईच्या रखडलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. त्याचा त्रास वारकऱ्यांना नक्‍कीच झाला असता. मात्र, पावसाने दिलासा दिल्यामुळे वारकऱ्यांसह पालिका प्रशासनाने सुटेकचा नि:श्‍वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)