देशी शीतपेयांकडे नागरिकांचा कल

माळेगाव रोड लगत थाटली दुकाने

माळेगाव- उन्हाचा चटका वाढू की, हळूहळू शीतपेयांकडे लोकांचा कल आपोआपच वाढू लागतो. मात्र, नागरिकांची पसंती कृत्रिम शीतपेयांऐवजी पारंपारिक शीतपेयांनाच असल्याचे चित्र सध्या माळेगाव रोड लगत असणाऱ्या छोट्या दुकांनामध्ये पाहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यांची पावले आपोआपच रस्त्याच्या कडेला नव्याने थाटलेल्या रसवंतीच्या गृहाकडे पडू लागली आहेत. जास्त पैसे मोजून देशी-विदेशी शीतपेये खरेदी करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही. पण ताज्या उसाच्या रसाला लोकांची पसंती असल्याने रस्त्याच्या कडेला जागोजागी उभारलेल्या दुकानांनी अनेक संसारांना आर्थिक आधार दिला आहे.

उन्हाळ्याची चाहूल आता लागलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना थंडाव्याची आवश्‍यकता असते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत असल्याने वेगवेगळ्या पेयांद्वारे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी उसाचा रस, लिंबाचे, कोकम सरबत, नीरा, जलजिरा अशा विविध नैसर्गिक पदार्थ वापरुन केलेल्या पेयांची दुकाने माळेगाव, वडगाव निंबाळकर या ठिकाणच्या रस्त्यावर मांडलेली आहेत.
पूर्वी बैलाच्या साह्यायाने लाकडी चरख्यावर रस काढला जायचा; परंतु लाकडी चरखा व बैल दुरापास्त झाले असून सगळीकडे इंजीन चरख्याचा वापर अधिक केला जात आहे. कमी खर्चात सुरु होणारा हा व्यवसाय असल्याने अनेक लोक उन्हाळ्यात उसाचे चरखे सुरु करुन रसाची विक्री करताना पाहावयास मिळत आहे. सध्या उसाचे चरखे सुरु झाले असून लोकांची गर्दीही दुकानात वाढू लागली आहे.

  • विदेशी शीतपेयांपेक्षा उसाच्या रसाला पसंती
    सध्या बारामती तालुक्‍यात रस्त्यांवर विविध प्रकारची थंड पेय उपलब्ध आहेत. मात्र, रसवंती दिसताच वाटसरुंची पसंती उसाच्या रसाला मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. कमी पैशांमध्ये शरीराला थंडावा देणारे शीतपेय म्हणून याकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे आरोग्यालाही लाभदायक असल्याने लोकांची रसाला अधिक पसंती आहे. सध्या उसाचा रस 15 ते 20 रुपये ग्लास असा विकला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)