देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समविचारी लोक एकत्र येण्याची गरज -विदुरा उर्फ नानासाहेब नवले

तळेगाव दाभाडे : मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करताना माजी खासदार नानासाहेब नवले, माजी मंत्री मदन बाफना आणि मान्यवर.

तळेगाव स्टेशन – सध्या सर्व क्षेत्रांत अहंकार बोकाळला असून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समविचारी माणसे एकत्र आली पाहिजेत. कृष्णराव भेगडे यांनी आयुष्यभर समाजाच्या उद्धारासाठी सद्‌गुणी लोकांना एकत्र घेऊन मोठी कामे केली. परंतु पद प्रतिष्ठेचा अभिमान, गर्व कधीही केला नाही, असे प्रतिपादन माजी खासदार व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांनी केले.

मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, डॉ. अशोक निकम, राजाराम म्हस्के, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, संचालक माऊली दाभाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, मुकुंदराव खळदे, सुरेशभाई शहा, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, विलास काळोखे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते.
नवले म्हणाले की, कृष्णराव भेगडे यांनी नेहमी संत विचारांनी काम केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे त्यांनी समविचारींना एकत्र केले. भेगडे यांनी कधीही राग, लोभ, लालसा आणि गर्व केला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मदन बाफना म्हणाले की, संघर्षाचे राजकारण सोडून भेगडे यांनी प्रेमाच्या राजकारणाची कास धरली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम तालुक्‍यातच नव्हे, तर जिल्ह्यात देखील मोलाचे आहे. समाजकारणात आणि राजकारणात कसे वागायचे, याची शिकवण भेगडे यांच्या रूपाने तरूण पिढीपुढे आहे. आजही त्यांच्या कार्याचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा आहे.
आमदार बाळा भेगडे म्हणाले की, कृष्णराव भेगडे यांची कारकीर्द देदीप्यमान आहे. राजकारणात सर्वांना बरोबरीने घेऊन काम केल्याने ते आमच्यासाठी दीपस्तंभ आहेत. संघर्षमय वातावरण संपवून त्यांनी मैत्रीमय वातावरण निर्माण केले. त्यामुळे तालुक्‍यासारखे समविचारींचे राजकारण राज्यात कुठेही दिसत नाही.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. रोटरी क्‍लब तळेगाव सिटी तर्फे त्यांना “व्होकेशनल एक्‍सलन्स पुरस्कार नानासाहेब नवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कृष्णराव भेगडे म्हणाले, माझ्या मनात मोठेपणाचा विषय नाही. लोकांच्या सहकार्यामुळेच मोठी कामे करता आली. देशातील 63 टक्‍के लोकांच्या घरात चूल पेटण्याची भ्रांत असताना त्यांचे दु:ख निवारण करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता अशा उपेक्षितांसाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. राजकारणाला विकृत स्वरूप आले असून राजकारण हे शिवी वाटत आहे. राजकारण हे समाज सेवेचे साधन बनले पाहिजे. ही स्थिती बदलण्याचे आव्हान युवकांपुढे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून 80 टक्‍के समाजकारण व 20 टक्‍के राजकारण करण्याचे मी शिकलो आहे.

नवी पिढी घडवण्याचे काम केवळ शिक्षण संस्थाच करू शकतात, म्हणून भेदाभेदांच्या पलिकडे जाऊन आम्ही ध्येयवादाने शिक्षण संस्थांतून हे काम करत असतो. यापुढे याचे महत्त्व लोकांना कळेल. शेती, शिक्षण आणि सहकार या तीन गोष्टींनाच आपण अधिक महत्त्व दिले आहे. आता वयोमानाच्या मर्यादेमुळे आपण विविध संस्थावरील पदांच्या जबाबदारीतून लवकरच मुक्‍त होणार असून केवळ एक कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

इंद्रायणी महाविद्यालय विकास समितीवर नव्याने नियुक्‍ती झालेल्या विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, सुनील काशिद, संजय साने, संजय वाडेकर आदी सदस्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. शैलेश शहा यांनी प्रास्ताविक केले. विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संदीप काकडे आणि प्रा. संदीप भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक शहा यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)