देशात प्रवासी विमान तयार करण्यासाठी प्रयत्न

मुंबई -भारत दरवर्षी परदेशातून मोठ्या संख्येने विमान विकत घेत आहे. जर अशी विमाने भारतात तयार झाली तर त्यामुळे भारताचे परकीय चलन मोठया प्रमाणात वाचणार आहे. भारतात गेल्या सात दशकात मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे भारतात विमाने तयार करण्याच्या शक्‍यतेवर विचार चालू आहे. त्यासाठी एक कृती दल तयार करण्यात येणार आहे. मुंबई शेअर बाजाराने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलतांना उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहीती दिली.

ते म्हणाले की, नागरी विमान वाहतूक मंत्रालय कृती दल तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यात सर्व संबंधित मंत्रालयाचे प्रतिनिधी असणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.भारतात आगामी काळतही विमान वाहतूक मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे विमान कंपन्यानी आतापर्यंत शेकडो विमानाच्या ऑर्डर बाहेरच्या देशातील कंपन्याना दिल्या आहे. अशी विमाने भारतात बनविली जाऊ शकतात असे सरकारला वाटते. त्यासाठीचे आवाश्‍यक तंत्रज्ञान भारतात आहे.

त्याचबरोबर आवश्‍यक मनुषयबळही भारताकडे आहे. काही खासगी कंपन्या या शक्‍यतेवर विचार करीत आहेत. या सर्वाचा समन्वय राहण्याची गरज आहे. कृती दल त्या दृष्टिकोनातून विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारतात प्रवासी विमान तयार व्हावे तसेच त्यासाठीचे सुटे भागही भारतात तयार व्हावे यासाठी सरकार मेक ईन इंडिया अंतर्गत प्रयत्न करीत आहे.

प्रवासी वाहतुकीबरोबरच देशात विमानाद्वारे मालवाहतूकही वाढली आहे. त्यासाठीही व्यापक धोरण तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भारतात काही वर्षात 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे. त्यासाठी असे मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विमाने आणि हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित उपकरणांची निर्मिती, हवाई वाहतूक क्षेत्रासाठीची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य असून, त्याचबरोबरीने भारतात जागतिक तोडीच्या माल आणि प्रवासी हब निर्मितीलाही आपले प्राधान्य असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. विविध विमान वाहतूक कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, विमानतळ संचालक, तसेच प्रवासी सेवा, सुरक्षितता, पायाभूत सुविधा, इत्यादी सेवांशी संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

हवाई वाहतूक उद्योग क्षेत्रातली वाढ, जागतिक तोडीची राहील, याची खातरजमा करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अशा बैठका आयोजित केल्या जातील अशी माहिती प्रभू यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)