देशात जातीय दंगली घडवून सरकारचा अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
मुंबई – देशासह महाराष्ट्रात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात धार्मिक दंगे होत नसल्याने आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य सरकारकडून करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात आधी मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करून बघितला. मात्र मुस्लिम समाज शांत राहिला, यांच्या प्रयत्नांना तो फसला नाही. म्हणून आता दलित आणि सवर्ण असा वाद लावून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून देशात दंगल घडून अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल व सरकारला अंतर्गत आणिबाणी लागू करता येईल. आणिबाणी लागू झाल्यानंतर अंतर्गत सुरक्षेचे कारण देत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलता येतील. या दृष्टीनेच केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरविल्याचा आरोप करण्यात येतो. ज्यांना अटक केली त्यातील सुधीर ढवळे वगळता इतर पाच जणांचा एल्गार परिषदेशी कोणताही संबंध नाही. सरकारचे तसे म्हणणे असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. तसेच न्या. पी. बी. सावंत आणि न्या. बी. जी. कोळसे-पाटील या दोघांनीही उघडपणे आपणच एल्गार परिषद आयोजित केल्याचे म्हटले आहे. मग परिषदेच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या युवक-विद्यार्थ्यांवर कारवाई करत बसण्यापेक्षा कोळसे-पाटील आणि सावंत यांच्यावर सरकारने कारवाई करून दाखवावी, असेही ते म्हणाले.

नक्षलवाद्यांनी लिहिलेले पत्र मध्यंतरी प्रसारमाध्यमांत आले. त्यात उल्लेख करण्यात आलेला कॉम्रेड प्रकाश म्हणजे मीच असा प्रसार करण्यात आला. पण पोलिसांनीच आता स्पष्ट केले आहे की हा कॉम्रेड प्रकाश गुवाहाटीमधील आहे. पण हे पत्र प्रसारमाध्यमांकडे कसे पोहोचले हे देखील विचार करायला लावणारे आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध करा
भीमा-कोरेगाव येथे राहुल फटांगडे या युवकाची हत्या करणाऱ्यांचे फोटो पोलिसांनी तत्परतेने प्रसिद्ध केले आहेत. ते व्हायलाच हवे होते पण त्याच तत्परतेने 1 जानेवारीच्या दंगलीत ज्यांनी जाळपोळ, तोडफोड केली त्यांचेही फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांच्यात दंगलखोरांचे चेहरे स्पष्ट दिसतात. मग त्यांचे फोटो का प्रसिद्ध करण्यात येत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)