देशाच्या कल्याणात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची : उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

हवामान बदल हे संपूर्ण जगासमोरचे आव्हान

नवी दिल्ली – देशाच्या कल्याणात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून, देशातली अन्नसुरक्षा राखण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असल्याचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे डब्ल्यूआरआय इंडियाने आयोजित केलेल्या “कनेक्‍ट करो’ या वार्षिक समारंभात बोलत होते. कृषी क्षेत्र अधिक फायदेशीर व शाश्वत होण्यासाठी पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांच्या मालाला अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

निसर्गाच्या संवर्धनासाठी विकासाच्या धोरणात सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्‍यक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. हवामान बदल हे संपूर्ण जगासमोरचे आव्हान आहे. निसर्गाचे संतुलन साधण्यासाठी सरकार, जनता, खासगी क्षेत्र सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वृक्षारोपण, स्वच्छता, स्त्रीशिक्षण यावर रचनात्मक लोकचळवळींचे आवाहन त्यांनी केले. निसर्गसंवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून दिले गेले पाहिजेत.

आर्थिक विकासाशी तडजोड न करता कार्बन उत्सर्जन कमी करणारे विकासाचे मार्ग जाणीवपूर्वक अवलंबण्याची, नैसर्गिक संसाधनांचा वापर न्याय्य आणि संवेदनशीलतेने करण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला. लोकसंख्या वाढ आणि त्याच्या परिणामांबाबत रचनात्मक परिसंवादाची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

नवीकरणीय ऊर्जा स्रोतांसाठी भारत प्रतिबद्ध असून, यातूनच आंतरराष्ट्रीय सौरआघाडीची स्थापना झाली आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्याची आणि सकल देशांतर्गत उत्पादनात योगदान देण्याची क्षमता आहे. तसेच यामुळे अधिकाधिक स्वच्छ ऊर्जा निर्माण होईल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. वायू प्रदूषण आणि त्याच्या परिणामांबाबत विशेषत: मुलांवर होणाऱ्या परिणमांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)