देशव्यापी संपाला पुण्यात प्रतिसाद

पुणे – संरक्षण उत्पादन क्षेत्रात वाढणारा खासगी कंपन्यांचा हस्तक्षेप आणि मिलिटरी फार्म्स, ऑर्डीनन्स डेपो यांच्या बंदीचा निर्णय याविरोधात आयुध निर्मिती कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुण्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील खडकी आणि देहूरोड येथील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातील सुमारे 90 टक्‍के कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.

संरक्षण दलासाठी आयुध निर्मितीचे काम करणारे शहरातील सुमारे 25 हजार कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रांत खासगी कंपन्यांना सरकारकडून दिले जाणारे प्राधान्य, लष्कराच्या काही दुरुस्ती डेपोच्या बंदीचा निर्णय तसेच न्यू पेन्शन स्किम रद्द करण्याचा निर्णय अशा विविध निर्णयांचा विरोध करण्यासाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, यादरम्यान देहू आणि खडकी आयुध निर्माण करखाने तसेच इतर संरक्षण उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे कामकाज बंद राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लष्कराच्या तिन्ही दलांसाठी आवश्‍यक शस्त्रास्त्रे व स्फोटके निर्माण करून ते पुरविण्याचे काम आयुध निर्मिती कारखान्यांमध्ये केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारतर्फे शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात आहे. याविरोधात कर्मचाऱ्यांकडून हा संप केला जात आहे. हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी केला जात नसून, केवळ संरक्षण उत्पादन निर्मितीतील खासगीकरणाला विरोध करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळेच हा संप महत्त्वपूर्ण ठरतो. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष नीलेश खेडकर यांनी सांगितले. या संपाचे नेतृत्व बीपीएसचे सहसचिव ज्ञानेश्‍वर जाधव, एआयडीइएफ संस्थेचे सचिव रवींद्र रेड्डी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)