“देशव्यापी बंद’साठी विरोधकांनी कंबर कसली

राष्ट्रवादी कॉंग्रेससह डाव्यांचाही पाठींबा
मुंबई – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसची दरवाढ आणि भडकलेल्या महागाईच्या विरोधात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सोमवारी (10 सप्टेंबर) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या निमित्ताने विरोधी पक्ष एकवटला आहे. राष्ट्रवादीसह डावे पक्ष आणि विविध कामगार संघटनांनी बंदला समर्थन दिल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुंबईतील बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी विरोधी पक्षाने कंबर कसली आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना निरूपम आणि मलिक यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर तोफ डागताना मुंबईतील बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. महागाईला निमंत्रण देणा-या इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही दोघांनी केले.

परवाच्या भारत बंदला खासदार शरद यादव यांचा जनता दल पक्ष, सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्ष, खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष यांच्यासह बॅंक, विमा कंपन्या, पेट्रोलपंप असोसिएशन, आहार संघटना आणि मुंबईतील 27 मोठ्या बाजारपेठांनी बंदला पाठिंबा दिल्याची माहिती संजय निरूपम यांनी दिली. जनतेच्या हितासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पेट्रोल, डिझेलचा वस्तू आणि सेवा करात समावेश करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी यावेळी केली.

शिवसेनेने सुवर्णसंधी साधावी
आज देशातील 22 राज्यात भाजपचे सरकार आहे. जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर ते निर्णय घेऊ शकतात. पेट्रोलवर आकारल्या जाणा-या उत्पादन शुल्काचा दर 8 रूपये प्रती लीटरवरून 19 रूपये असा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

बंदच्या दिवशी रस्त्यावर सन्नाटा होऊ द्या. या सन्नाट्याची ताकद काय असते ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळू द्या. देशाची आर्थिक राजधानी बंद झाली तर देश बंद झाल्याचा संदेश जाईल, असेही मलिक म्हणाले. भाजप सरकारला धक्का देण्याची सुवर्णसंधी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)