देशभरात उत्पादन घटल्याने ‘तीळ रुसली’

मकर संक्रातीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढली


पंधरवड्यात किलोमागे 40 ते 50रु. भाववाढ

पुणे – गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन फक्‍त 40 टक्केच झाले आहे. तर, आगामी मकर संक्रातीमुळे सध्या तिळाला मागणी वाढली आहे. मागील 15 ते 20 दिवसात मार्केट यार्डातील भुसार बाजारात तिळांच्या भावात किलोमागे तब्बल 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
कच्च्या तिळाला प्रतिकिलोस 140 ते 150 रुपये, तर स्वच्छ तिळास (वॉश केलेले) 165 ते 170 रुपये भाव मिळत आहे. उन्हाळी उत्पादन घटल्यास तिळाच्या भावात वाढ होण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

तिळाचे भाव
140 ते 150 रु.
प्रतिकिलो (यंदा)


100 ते 110 रु.
प्रतिकिलो (मागील वर्षी)

गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत प्रामुख्याने तिळाचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी आहे. गेल्या वर्षी देशात तिळाचे उत्पादन 4 लाख 50 हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा सुमारे 1 लाख 77 हजार मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. मे 2019 मध्ये बाजारात येणारे उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण 70 हजार मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी तिळाचे भाव 100 ते 110 रुपये किलो होते, अशी माहिती तिळाचे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात तीळ उत्पादनात झालेली घट 15 नोव्हेंबर 2018 रोजी समोर आल्यानंतर बाजारात तिळाचे किलोचे भाव 170 ते 175 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, जगभरातील तीळ उत्पादन वाढीची आकडेवारी जाहीर होताच तिळाच्या भावात घट होऊन ते 140 ते 150 रुपयांवर आल्याचे पटेल यांनी सांगितले.

तिळाची आयात परदेशातून केली जाते. आयात तिळावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यंदा देशांतर्गत तिळाचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी तिळाच्या उत्पादनाची परिस्थिती मेमध्ये समोर येणार असली, तरी दुष्काळामुळे उत्पादन वाढण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध तीळ उत्पादनावरच आपली गरज भागवावी लागणार आहे. मात्र, तिळाचे भाव वाढल्यास तिळाची मागणी घटून खपावर परिणाम सुरू झाला आहे.
– अजित बोरा, तीळ व्यापारी.

तीळ उत्पादनाची अधिक माहिती
जगात सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया, नायझेरिया आदी आफ्रिकन देशासह भारत, चीन, पाकिस्तान, कोरिया आदी देशांत तिळाचे उत्पादन घेतले जाते. 2017-18 मध्ये जगभरात तिळाचे उत्पादन 21 लाख मेट्रिक टन इतके झाले होते. 2018-19 मध्ये त्यात वाढ होऊन 24 लाख 77 हजार मेट्रिक टन इतके झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)