देशभरातील टोलनाकेही होणार कॅशलेस

पुणे – नोटाबंदीनंतर देशभरातील बहुतांशी व्यवहारांनी कॅशलेशकडे वाटचाल सुरु केली आहे, त्याचा लाभ नागरिक आणि संबधित व्यवसायिकांना होत आहे. याच धर्तीवर देशभरातील टोलनाके कॅशलेश करण्याबाबत रस्ते वाहतूक मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे. विशेष म्हणजे नव्याने उत्पादित होणाऱ्या वाहनांसाठी ई- टोल वसूलीसाठी एक विशेष यंत्रणा बसविण्यात येणार आहे. फॉस्टॅग नावाची ही यंत्रणा असून 1 जुलै 2017 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
वाहनांच्या समोरील काचेवर अथवा दर्शनी भागावर हा टॅग लावण्यात येणार आहे. काही वाहने उत्पादनानंतर बांधणीपूर्वीच थेट वितरकांकडे पाठविली जातात, त्याठिकाणी सुट्टे भाग जोडून पूर्ण बांधणीतील वाहन विक्रीसाठी ठेवले जाते. अशा वाहनांना वितरकांनी फॉस्टॅग लावावा, असे बंधनकारक करण्यात येणार आहे. या फॉस्टॅगच्या आधारे संबधित वाहनांचा टोल ऑनलाईन पध्दतीने भरला जाणार आहे, या प्रक्रियेमुळे टोलनाक्‍यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी होणार असून इंधनही वाचणार असल्याचा दावा मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
टोल, नाका, आणि चेकपोस्ट अशा ठिकाणी या फॉस्टॅगचा उपयोग होणार आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे दरवर्षी 87 हजार कोटी रुपयांचे इंधन वाया जात आहे, असा निष्कर्ष एका संस्थेच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे वाहन निर्मितीच्या वेळीच फॉस्टॅग लावण्याचे बंधनकारक करण्यात येणार असून टोलनाक्‍यावरील रांगा कमी करण्यास ते फायदेशीर ठरणार आहे. फॉस्टॅग या नियमांची 1 जुलै 2017 पासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मदत घेण्यात येणार आहे, आरटीओमध्ये नवीन वाहनांची नोंदणी करताना फॉस्टिग असेल तरच नोंदणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)