देव देव्हाऱ्यात नाही

सकाळी उठल्यावर देवदर्शनानंतर मोबाइलदर्शन घेण्याची इतरांप्रमाणे मलाही सवय आहे. मात्र, सकाळी मी मोबाइलसाठी मोजून पाच मिनिटे देते. बाकी कॉलस्‌ वगैरेवर एक नजर टाकून आनंदी पहाट आवर्जून पाहते आणि त्यात आलेले गाणे ऐकते, त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते. आज सकाळीच मोबाइल हाती घेतला तर व्हॉटस्‌ऍपच्या आनंदी पहाटवर एक गाणे आलेले-

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी 
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्यायी….

गाणे वाचून आणि नंतर ऐकून फार समाधान वाटले. “देव नाही देवालयी’ हे माहीत असतानाही आपण सारे अंत:करणातील देवाला सोडून उगाचाच इकडेतिकडे धावत राहतो. सुधीर फडके यांचा आवाज आणि गायकीच अशी आहे, की माणसे त्यात हरवून जातात. मागे एकदा कोणी तरी, मला वाटते दिग्दर्शक म. गो. पाठक यांनी त्यांचे वर्णन करताना स्वरतीर्थ असा अतिशय सार्थ शब्द वापरला होता. खरोखरंच सुधीर फडके म्हणजे साक्षात स्वरतीर्थच आहे. कान, कानाच्या माध्यमातून मन आणि अंत:करणही पावन करणारे स्वरतीर्थ ! चालू वर्ष हे गदिमा आणि सुधीर फडके या दोघांचेही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ज्या गीत रामायणाच्या शब्द आणि सुरांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले, देशाला संपन्न केले, त्याच्या दोन्ही मानकऱ्यांचे गदिमा (गजानन दिगंबर माडगूळकर) आणि सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हा एक मोठा योगायोग आहे.

आनंदी पहाटच्या माध्यमातून रोज सकाळी एक छानसे गाणे वाचायला-ऐकायला मिळणे ही रोजचीच गोष्ट झाली आहे आमची, आमचीच नाही, तर अनेकांची-कदाचित शेकडो हजारोंची सकाळ सुप्रभात करण्याचे काम आनंदी पहाटचे संजय बांधवकर करतात. मला आनंदी पहाटचे गाणे गेले जवळपास वर्षभर, कदाचित जास्तच दररोज एक गाणे-त्याचे शब्द आणि पार्श्‍वभूमीसह व्हॉटस्‌ऍपवर मिळते आणि ही आनंदी पहाट -त्यातील गाणे हस्ते-परहस्ते साखळी पद्धतीने पुढे पुढे जात राहते. एकही दिवस न चुकता.

मागे एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र बंद होता, सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे भारत बंद पुकारला होता, त्यात महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तेव्हा आनंदी पहाटेने मोबाइलही बंद ठेवला, पण रोजच्या आनंदी पहाट (हे त्यांनीच दिलेले नाव) गीतात खंड पडू नये म्हणून आदल्या दिवशी रात्रीच गाणे व्हॉट्‌स ऍपवर पाठवून दिले, खुलाशासह. अर्थात ही सारी गाणी माझ्याकडे माझ्या भावाकडून येतात आणि मी ती पुढे माझ्या दोनतीन मैत्रिणींना आणि ग्रुपला फारवर्ड करते.

माझा भाऊ सांगतो- 
दिवसाची सुरुवात अतिशय प्रसन्नपणे करण्याचे काम संजय बांधवकर करतात. काही माणसे आनंद देण्यासाठीच असतात. फुलाने सुगंध सहजपणे वाऱ्यावर दरवळावा आणि सारे वातावरण सुगंधित करून टाकावे, तसे त्यांचे अस्तित्व आनंद पसरवणारे असते. अगदी दूरवर देखील. मोबाइल या गॅजेटबद्दल काहीही बरीवाईट मते असोत. त्यातूनही आनंद पसरवणारी माणसे, गट असतात. मोबाइलवरचे रोजचे साधे गुडमॉर्निंग वा सुप्रभातही किती छान होऊन येते.

आनंदी पहाटच्या आजच्या गाण्यापूर्वी गदिमा आणि सुधीर फडके यांच्याबद्दल लिहिताना शेवटी म्हटले आहे,
त्यांची देवावर तेवढी भक्ती होती. परमेश्‍वर अस्तित्व या चराचरात कसे आहे याची साक्ष या एका वेगळ्या गाण्यात दिसून येते. मुख्य म्हणजे ते देवाला बंदिस्त न करता मानवतावादी विशाल दृष्टिकोनातून परमेश्‍वराचे अस्तित्व मांडताहेत-

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे 
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी 
देव शोधुनिया पाही, देव सर्वांभूती ठायी…. 

रोज नीत नवी प्रसन्न गाणी देणाऱ्या आनंदी पहाटचे पहिले गाणे मला मिळाले होते, ते 29 सप्टेंबर 2017 रोजी, म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वी आनंदी पहाटचे पहिले गाणे माझ्याकडे आले होते. गाणे होते-

हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे माणसांनी माणसांशी माणसासम वागणे मला माहीतही नसलेले हे गीत होते समीर यांचे त्यातील एका कडव्यात म्हटले होते,

धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे 
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे 
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे 
माणसांने माणसाशी माणसासम वागणे… 

खरेच असे शुद्धतेचे चांदणे जगावर पसरले, तर संपूर्ण जगच किती सुखी होईल..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)