देवेन शहा खून प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

जमिन व्यवहारातून खून ?

पुणे- बांधकाम व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 56, रा. प्रभात रस्ता) यांचा खून केल्याप्रकरणात डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी.गुळवे पाटील यांनी दिला आहे. या दोघांनी देवेन यांच्यासोबत मुळशी तालुक्‍यातील दारवली या गावात जमिनीचा व्यवहार केला होता. या व्यवहारातूनच त्यांचा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
नितीन दशरथ दांगट (वय 36, रा. वारजे माळवाडी) आणि समीर रजनीकांत सदावर्ते (वय 42, रा.शिवतीर्थनगर, कोथरूड) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. रवींद्र सदाशिव चोरगे (वय 40,रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) आणि राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 45, रा. वडगाव बुद्रुक), सुरेंद्र शामकेर पाल (वय 36, रा. ठाणे), शंकर लक्ष्मण नवले (वय 50, रा. चंदननगर) आणि सुनील ऊर्फ सोनू मदनलालजी राठोड (वय 34, रा. राजेंद्रनगर, मूळ. मध्यप्रदेश) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात राजेश ऊर्फ पंडित कमल अग्रवाल (रा. मध्यप्रदेश) आणि अभिमन्यू रामप्रसादनाथ तिवारी (रा. ठाणे) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रभात रस्त्यावरील लेन क्रमांक सातमधील सायली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पिस्तुलमधून गोळ्या घालून देवेन यांचा खून करण्यात आला होता. तर त्यांचा मुलगा अतित (वय 29) याच्या दिशेने गोळ्या झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत अतित याने फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दांगट आणि सदावर्ते या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी जमिनीच्या वादातून खून झाल्याचा संशय आहे. खूनाचा कट कशा प्रकारे आखण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)