देवेंद्रजी, एकदा पेय बदलून बघा!

मुख्यमंत्री साहेब! अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही चहापानाचंआयोजन करता आणि विरोधक त्यावर बहिष्कार घालतात. तुमचे मागील दोन्ही प्रयत्न फसलेत. एखादा डाव वारंवार उधळला जात असेल तर स्ट्रॅटेटेजी बदलावी, असं शहाणे म्हणतात. त्यामुळे तुम्ही एकदा स्ट्रॅटेजी बदलून बघा. विरोधी पक्षांच्या नेत्यांना चहा आवडत नसावा, असं समजून एकदा पेय बदलून बघा! हा प्रयत्न यशस्वी झाला, तर महाराष्ट्राच्या इतिहासात पेय-क्रांतीपुरुष म्हणून तुमचं नाव सुवर्णअक्षरात लिहिलं जाईल. भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री तुमचंअनुकरण करतील. राजस्थानचं सरकार आधी करील. कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री बेधडक तुमचा कित्ता गिरवतील. कॉंग्रेसचं अख्खं मुख्यालय तुमच्या पाठीशी उभं राहील.
अर्थात, कॉंग्रेससह सर्व विरोधकांना मित्र बनविण्याचं जे अवघड कार्य परमश्रध्देय श्री. अटल बिहारी वाजपेयी आणि श्री. लालकृष्ण अडवाणी यांना जमलं नाही, ते तुमच्या एका निर्णयानं सिध्द होईल. शिवसेनेच ंसोडा! त्यांचं काही होऊ शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं काम केलं, तरी श्री. उध्दव ठाकरे विरोध करतील. चहापानातील पेय बदलून देवेंद्र फडणवीस (ते श्री लावत नसतात.) यांनी मराठी माणसाचा विश्‍वासघात केला आहे. या सरकारनं शिवरायांचे संस्कार गुंडाळून ठेवलेआहेत. यामुळं पुढच्या निवडणुकीत हा मराठी माणूस या सरकारचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असंच म्हणतील. म्हणून त्यांचा फार काही विचार करू नका!
देवेंद्रजी तुम्ही मोठ्या मनाचे आहात. सात्त्विक वृत्तीचे आहात. तुम्ही ठरविलंअसतं, तर आज मुंबईचा महापौर भाजपचा असता. परंतु तुम्ही उदारता दाखविली आणि सेनेला पाठिंबा दिला. तरीसुध्दा, त्यांचं तोंड वाकडंच! आणि भविष्यातही वाकडंच राहणार. विधान सभा आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत तुम्ही जे काही केलंय ते ठाकरेशाहीच्या फार जिव्हारी लागलं आहे. म्हणून त्यांचा फार विचार करू नका!
देवेंद्रजी, लक्षात ठेवा, टीका आणि बदनामीची तमा न बाळगता बोल्ड निर्णय घेणारा माणूसच क्रांती घडवून आणतो. इतिहास हा इतिहास मोडणाऱ्यांचाच घडत असतो! मात्र, आम्हाला एक समजलं नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांना नेमकं काय हवं असतं हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ेठाऊक असेल. एवढी वर्षे तुम्हीच विरोध करत होता. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर तुम्ही नेहमीच बहिष्कार टाकत आलात. चहापानाच्या कार्यक्रमात जे काही तुम्हाला अपेक्षित होते, तेच आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपेक्षित असेल; एवढी साधी बाब तुमच्या लक्षात कशी आली नाही?
तरी सुध्दा, मागील दोन वर्षांपासून चहापानावर सरकारी पैसा खर्च करीत आहात? अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावं. लोकहिताची कामे पार पडावी. हेल्दी चर्च्‌ा व्हावी. सगळ्यांनी सभागृहात आपले विचार मांडावे आणि त्यातून जे अमृत निघेल त्यावर सरकारने कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा असते. विरोधकांना यासाठी प्रवृत्त करण्याकरिताच चहापानाचा कार्यक्रम असतो. पण, विरोधक बहिष्कार टाकतात. हा प्रकार फक्त तुमच्याच काळात होतोय असं नाही. फार आधीपासून होतो आहे.
या काळात एखाद्या मुख्यमंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमात पेय बदलण्याचा प्रयोग करून बघितला असता तर कदाचित महाराष्ट्र वेगळा दिसला असता. या एकट्या कार्यक्रमावर आतापर्यंत वाया घालविलेल्या पैशांचा हिशेब लावला, तर जागोजागी त्रिकोणी पार्क (फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोरील बागेचे नाव.) तयार करता आल असते.
म्हणून, फडणवीस साहेब,आता तरी हा अपव्यय थांबवा. एक तर चहापानाचा कार्यक्रम रद्द करा, नाही तर त्यातील पेय तरी बदला. हे पेय पोटात गेल्यानंतर माणूस मनमोकळ्या गप्पा मारतो. पोटात एक आणि ओठात एक असं राहत नाही. विरोधकांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी लाय डिटेक्‍टर मशिन लावण्याची काहीच गरज नाही. फक्त पेय बदला. नाही तर, हा कार्यक्रम बंद पाडा. हाच पैसा आणखी दहाबारा स्वयंसेवकांची नेमणूक ओएसडी म्हणून करण्याच्या कामी येईल!

वंदना बर्वे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)