देवापुढील दान हे ट्रस्टचे उत्पन्न

खासगी व्यक्‍तीस हक्‍क सांगता येणार नसल्याचा दिला निर्णय


जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुणे – भाविकांकडून देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीस हक्‍क सांगता येणार नाही, अथवा हिस्सा घेता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला आहे. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीमध्ये अर्पित उत्पन्न हे पूर्णपणे त्या मंदिराच्या ट्रस्टची मिळकत असून त्या रकमेचा विनियोग त्या देवस्थानच्या उद्दिष्टांसाठी, भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी करण्यास संबंधित ट्रस्टचे विश्‍वस्त जबाबदार आहेत.

रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद आणि मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपती समोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्‍कम पूर्णत: त्यांना घेण्याचा हक्‍क आहे, असे दिवाणी न्यायालयाने घोषीत करावे असा दावा दाखल केला होता.

देवासमोरील थाळीतील उत्पन्न कोणी घ्यावे, यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिरूर तालुक्‍याचे तहसीलदार यांचे मध्यस्थीने सर्वसंमतीने गाभाऱ्यासमोर स्वतंत्र गुप्तदान पेटी ठेवण्यात आली. यातील उत्पन्न स्वतंत्र बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. हे सर्व उत्पन्न पुजारी म्हणून वैयक्तिकरित्या घेण्याचा हक्‍क आहे, असा कुलकर्णी बंधूंनी दावा केला होता. तसेच दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत ही रक्‍कम घेण्यास देवस्थान ट्रस्टने हरकत करू नये, अशी अंतरिम मनाई मागितली होती. दिवाणी न्यायालयाने पुजाऱ्यांना दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत दरमहा पंचवीस हजार रुपये ट्रस्टने द्यावेत आणि गाभाऱ्यासमोर ठेवलेल्या गुप्तदान पेटीतील देणगी रकमेचा वापर करण्यास ट्रस्टला मनाई केली होती. केवळ पंचवीस हजारच नाही तर गुप्तदान पेटीतील पूर्ण रक्‍कम मिळावी यासाठी कुलकर्णी बंधूंनी या निकालाविरुद्ध पुणे जिल्हा न्यायालयात अपील केले होते. तर, देवासमोर भाविकांनी अर्पण केलेल्या दानपेटीतील रक्‍कम ही ट्रस्टची मिळकत असून त्यावर कोणीही वैय्यक्तिकरित्या हक्‍क सांगू शकत नाही, यासाठी देवस्थानने ट्रस्टचे वकील शिवराज कदम जहागिरदार यांच्यामार्फत या निकालाला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. पुजाऱ्यांतर्फे त्यांना ग्रामजोशी म्हणून मिळालेल्या तत्कालीन इंग्रज सरकारच्या सनदेनुसार वतन जमिनी आणि देवाचे पुजारी म्हणून हे सारे उत्पन्न घेण्याचा हक्‍क असल्याचा युक्तिवाद केला.

अॅड. कदम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देऊन जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की देवापुढे अर्पण केलेले दान हे संबंधित देवस्थान ट्रस्टची मिळकत आहे. या रकमेचा विनियोग केवळ देवस्थानचे उद्दीष्ठांसाठी करून त्याद्वारे तेथे येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सोईसुविधा पुरविण्यासाठी करण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे.

देवस्थान ट्रस्टना दिलासादायक निकाल
पूर्वीच्या काळी देवस्थाने वतनदार व्यक्तींच्या ताब्यात होती. त्यावेळी तेथील उत्पन्न वैय्यक्तिकरित्या घेतले जात असे. त्यातून देवस्थानांचा विकास होत नसे. 1950 साली ट्रस्ट कायदा अंमलात आल्यानंतर अशा सर्व सार्वजनिक देवस्थानांची नोंदणी होऊन विश्‍वस्त मंडळाची संकल्पना अस्तित्वात आली. त्यानुसार अशा सर्व सार्वजनिक देवस्थानांच्या स्थावर, जंगम मिळकतींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विश्‍वस्त मंडळाचे दायित्व झाले. विश्‍वस्त मंडळाने या सर्व उत्पन्नाचे सुनियोजन करून भाविकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे ट्रस्टचा अतिरिक्त संपत्ती शैक्षणिक मदत, धर्मादाय रुग्णालय, दुष्काळ निवारण, पाणीपुरवठा अशा समाज उपयोगी कामांसाठी वापरात आणला पाहिजे, असे अॅड. शिवराज कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)