देवदैठण येथील उपोषणाचा सहावा दिवस 

विविध मागण्यांवर बनकर महाराज ठाम
सुपा – श्रीगोंदे तालुक्‍यातील देवदैठण येथे संतोष महाराज बनकर यांनी विविध सामाजिक मागण्यांसाठी सुरु केलेले उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच आहे.
मंगळवार (दि.2) रोजी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी देवदैठण येथील बसस्थानकावर बनकर यांनी भारत निर्माण पेयजल योजने अंतर्गत 2010 ते 2012 दरम्यान झालेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी व्हावी, गावठाण व महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटवावे, स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, 65 वर्षापुढील शेतकऱ्यांना 5000 रुपये पेन्शन मिळावी आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.
भारत निर्माण पेयजल योजनेंतर्गत 2010 ते 2012 च्या दरम्यान झालेल्या लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतून गावातील साकळाई, पासोडी मळा व ढवळे, गायकवाड, बनकर, खेडकर वस्तीवर पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र तेंव्हापासून आजतागायत या वाडया वस्त्यांवरील ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने लाखो रुपये पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. शिवाय पाईपलाईन करताना वापरण्यात आलेले पाईपही टेंडर पेक्षा कमी इंचाचे वापरले असल्याने यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत बनकर यांनी सदर कामाची सखोल चौकशी करावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अनेक व्यावसायीकांनी टपरी वा छोटे-मोठे हॉटेल, दुकान टाकताना अतिक्रमण केले आहे. मुख्य पेठेत अनेकांनी अतिक्रमण करताना घरासमोरे ओटे बांधले आहेत. मंदिराभोवती केलेल्या अतिक्रमणांमुळे धार्मिक कार्यक्रमांना अडथळा येत आहे. त्यामुळे गावातील महाराष्ट्र शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी बनकर यांनी केली आहे. अनेक महिन्यांपासून गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभधारकांना धान्य मिळत नाही, स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्राहकांना चुकीची वागणूक मिळत आहे. त्याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही ठोस निर्णय घेतला गेला नाही, त्यामुळे धान्य पुरवठा सुरळीत करावा व त्या दुकानदाराची चौकशी करुन त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी बनकर यांनी केली आहे.
सहाय्यक अभियंता डी. एस. लोढे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन 41 अतिक्रमणधारकांना लवकरच नोटीसा देऊन एक महिन्याचा कालावधी देणार आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले. तर तहसिलदार यांच्या वतीने तलाठी प्रताप माने यांनी उपोषणकर्ते बनकर यांची भेट घेऊन स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून त्याविषयी लेखी स्वरुपात जिल्हाधिकाऱ्यांना कळविले असल्याचे सांगितले. भारत निर्माण पेयजल योजने अंतर्गत पाणी पुरवठा आणि गावठाणातील सार्वजनिक ठिकाणच्या अतिक्रमणासंदर्भात मात्र गेल्या सहा दिवसात कुणीही फिरकले नाही. आपण घेतलेल्या सर्व विषयांवर योग्य तो तोडगा निघेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे बनकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)