‘देवगाणी’ तून अनुभविले भावसंगीतातील विश्वाचं स्वतंत्र बेट

पुणे, – दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे… अशी पाखरे येती… जीवनात ही घडी अशीच राहू दे… या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने रसिकांनी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव या मराठी भावसंगीतातील विश्वाचं स्वतंत्र बेट अनुभविले. मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, अरुण दाते, शंकर वैद्य, आशा भोसले, सुधा मल्होत्रा, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, प्रशांत दामले यांसारख्या दिग्गजांचे संगीत विश्वातील अनुभवांचा आस्वाद रसिकांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वरानंद प्रतिष्ठान प्रस्तुत देवगाणी हा सांगितीक कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मधुवंतीच्या सूरासूरातून आळविते मी राम… या गीताने झाली. यशवंत देवांचे जीवन म्हणजे एक अखंड कविता आणि गाणे आहे. त्यामुळे संत गोरा कुंभार यांचा निगुणाचे भेटी, आलो सगुणासंगे हा अभंग, माघाची थंडी ही लावणी आणि कुणी जाल का, सांगाल का… अरे संसार संसार…या जन्मावर, या जगण्यावर… तुझे गीत गाण्यासाठी… आदी रसिकांच्या मनात अनेक वर्षांपासून झिरपत असलेली गाणी ऐकणे ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी ठरली. यशवंत देव यांची भावगीते, चित्रपटगीते यांसह विडंबन गीतांतून उपस्थितांनी त्यांच्या संगीतप्रतिमेचे यौवन प्रत्यक्ष अनुभविले.
स्वरानंद संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भोंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. तर, मधुरा दातार, जितेंद्र अभ्यंकर, षिकेश बडवे, कविता जांभेकर (गायन) यांना पराग माटेगांवकर (संगीत संयोजन), राजेंद्र दूरकर (तबला), अभय इंगळे (रिदम मशिन), निलेश देशपांडे (बासरी), केदार परांजपे यांनी साथसंगत केली. शैला मुकुंद यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)