विंदा करंदीकर जयंती: देणाऱ्याने देत जावे…

असं म्हणतात देण्याची भावना प्रामाणिक असली की येण्याचा मार्ग मोकळा होत असतो.
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे…
विंदा करंदीकरांच्या या ओळी देण्याच्या भावनेबद्दल बरेच काही सांगून जातात.

आज समाजात प्रत्येकजण आपापल्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. आणि गरजा या कधीही संपत नसतात. गेल्या आठवड्यात आमच्या कार्यालयातील एक महिला कर्मचारी मला म्हणाली. सर माझा पगार वाढवा आता.

मी तिला म्हणालो, एका वर्षात 2 वेळा वेतनात वाढ होऊनही तू असं का म्हणतेस?
त्यावर ती म्हणाली, ‘सर पूर्वी आजच्यापेक्षा कमी वेतन मिळूनही सारेकाही व्यवस्थित चालले होते. परंतु आता आमच्या दोघांचे वेतन वाढले आहे. घरात छान पैसेही येतात पण ते कुठे जातात कळतंच नाही.’

यावर माझ्या लक्षात आले की, माणसाच्या गरजा या त्या अथांग सागराप्रमाणे असतात. त्या कधी संपतच नाहीत. दहा बाय दहा च्या घरापासून ते वन बीएचके फ्लॅट पर्यंत आपली मजल जाते. परंतु आपण त्यावर समाधानी राहत नाही मोठे घर, मोठा बंगला, नंतर मोठा महाल अशा गरजा वाढतच जातात. गरजा वाढणे ही एका दृष्टीने आपल्याला सातत्याने कार्यरत ठेवण्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा आपण गरजेपेक्षा अधिक मिळवत जातो तेव्हा आपल्यातील दानशूरपणा काही प्रमाणात का होईना दिसून यायला हवा.
प्रसिद्ध कवि हलसगीकर यांनी या अधिकच्या गरजांबाबत अतिशय सुंदर ओळी लिहिल्या आहेत. ते म्हणतात

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत.
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत.
थोडक्‍यात काय तर आपण जे अपेक्षेपेक्षा अधिक कमावतो त्यातील काही वाटा गरजूंसाठी देता आले पाहिजे. कारण आपण जेव्हा दाता म्हणून देतो तेंव्हा घेणाऱ्याच्या (गरजू) चेहऱ्यावरील समाधानात आपली खरी श्रीमंती दडलेली असते. आपल्या देशाच्या संस्कृतीला या दानशूरपणाचा खूप मोठा वारसा लाभला आहे.

महाभारतातील कर्णाच्या दानशूरपणाचे दाखले आजही आवर्जून दिले जातात. कर्णाने आपल्या दानशूरपणाने व त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले आहे. आज जगात पुष्कळ माणसे आपल्या दानशूरपणाबद्दल नावाजली जातात. भारतातही अनेक उद्योजक यात अग्रेसर आहेत. विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष, प्रख्यात उद्योजक अझीम प्रेमजी यांनी वॉरन बफेट, बिल गेट्‌स यांच्या ‘गिव्हिंग प्लेज’ नामक मोहिमेत सहभागी होऊन आपल्या उत्पन्नाचा 18% वाटा समाज कार्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला.

देण्याची भावना ही केवळ पैशांतूनच नाही मोजली जात. कुष्ठरोगाने तडफडणाऱ्या लोकांना जीवनदान देणाऱ्या बाबा आमटेंकडे कुठे होती अब्जावधींची संपत्ती ? परंतु केवळ समाजासाठी आपले योगदान देण्याची त्यांची भावना हजारो निराधारांना आधार देऊन गेली. आपल्याला योग्य वेळी योग्य मदत आणि योग्य त्या माणसाला करता आली पाहिजे.

मानव हा समाजशील प्राणी म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचा समाजशीलपणा हा त्याच्या सामाजिक बांधिलकीतून दिसून यायला हवा. यासाठी मानवाने निसर्गाचा आदर्श घ्यायला हवा. निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. एक बीज आपल्याला असंख्य फळे फुले देऊन जाते. परंतु आपण ते बीज वाटण्यापेक्षा स्वतः लाटण्याचा धुर्तपणा करीत असतो. आपण जेवढे देऊ त्याहून अधिक आपल्या पदरी पडत असते.

आज काल स्वतःच्या सवंग प्रसिद्धीसाठी झटणारे अनेकजण समाजसेवेचा व दानशूरपणाचा दिखावा करीत असतात. यातून त्यांना तात्पुरती प्रसिद्धी जरूर मिळते. परंतु पुण्य केल्याचे समाधान त्यांना मिळू शकत नाही कारण ते समाधान घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरही दिसत नाही .
रोमन तत्वज्ञ लुसीस सेनेका म्हणतात,”A gift consists not in what is done or given, but in the intention of the giver or doer.”

थोडक्‍यात काय तर दानशूरपणा हा वस्तू किंवा बक्षिसी देण्यावरून ठरत नसतो. तर देणाऱ्याची भावना त्याबाबत कितपत प्रामाणिक आहे यावरून ठरत असते. मित्रांनो आपल्याला आपल्यातील देण्याची भावना जागृत करता आली पाहिजे. कुणासमोर हात न पसरता गरजूंना मदत मिळणे, आणि आपण दान देत आहोत याचा प्रचार न करता देत राहणे या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत. खरा आनंद शोधायचा असेल तर तो घेणाऱ्यांच्या डोळ्यात आता शोधायला शिकूया.

सागर ननावरे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)