दृष्टीहीनांचा पुणे फेस्टीव्हलमध्ये ‘डोळस’ कलाविष्कार

पुणे  – पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमांचीही धूम सुरू झाली आहे. या कार्यक्रमांचा दुसरा दिवस गाजवला तो अंध कलाकारांनी डोळसपणे सादर केलेल्या “अपूर्व मेघदूत’ या नाट्यविष्काराने. महाकवी कालिदासाच्या मेघदूत या संस्कृत काव्यावरील या नाट्यविष्कारात संवाद होते, नृत्ये होती, मोठी स्वगत होती…..पण कुठेही न बुजता किंवा दडपण न घेता अगदी सराईत व्यवसायिक नाटकातील नटांप्रमाणे हलचाली, संवाद म्हणत सर्वच कलाकारांनी नाट्यरसिकांची मन जिंकली आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली.

पुणे फेस्टिव्हमध्ये बालगंधर्व रंगमंदीरात 19 अंध कलाकारांनी अपूर्व मेघदूत या दोन अंकी नाटकांचा प्रयोग सादर केला. पहिला अंक संपल्यानंतर या कलाकारांचा गौरव गायत्रीदेवी पटवर्धन यांनी केला तसेच डॉ लागू यांचाही पुणे फेस्टिव्हलच्या वतीने सत्कार केला. या नाटकाची संहिता आणि मेघदूत काव्यातून नाट्य रूपांतर आणि गीत गणेश दिघे यांनी लिहिली आहेत, तर दिग्दर्शन स्वागत थोरात यांनी केले आहे. असा मेघदूत काव्यावरील नाटयप्रयोग करण्याचे आव्हान आर्लिन संस्थेच्या रेश्‍मा पांढरे आणि वीणा ढोले व त्यांच्या टीमने सर्वप्रथम स्वीकारले. त्यांनी संच उभा केला आणि नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाचा याच कलाकारांच्या संचाने 14 वा प्रयोग सादर करून त्यांनी 14 विद्यांची देवता असलेल्या श्री गणेशाच्या चरणी कलेची सेवा रूजू केली.

या नाटकातील सर्व कलाकार हे 18 ते 20 वयोगटातील असून काहीजण पदवी, पदव्योत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत तर काही जण नोकरी करत आहेत. यातील कालिदासाची भूमिका करणारा अव्दैत मराठेसह पाच कलाकारांना उशिराने अंधत्व आलेले असल्याने त्यांना ब्रेल लिपी येत नाही. त्यानी ऑडिओ कॅसेट ऐकून संवाद पाठ केले आहेत. या नाटकाची सुरूवातच अव्दैतच्या सुमारे दहा मिनिटांच्या स्वगताने होते. यक्षाची भूमिका करणारा घायले हा सी. ए.ची फायनल परिक्षा देत असून कॉर्पोरेशन बॅंकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कामही करत आहे तर दामिनीची भूमिका करणारी तेजस्वीनीला चारच वर्षापूर्वी अंधत्व आले असून ती एम कॉम असून बॅंकेची परिक्षा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)