दृष्टीदाता समाजशील डॉक्‍टर तात्याराव लहाने

स्वप्न पहा, स्वप्न जगा म्हणत स्वप्न पाहिल्या शिवाय जगता येत नाही अशी शिकवण देत, स्वतःच्या कर्तृत्वावर एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्‍टर तात्याराव लहाने.

घरी अठरा विश्व दारिद्रय असताना त्यावर मात करून मराठवाड्यातील माकेगाव या अगदी छोट्याशा गावातून सुरू झालेला लहाने यांचा प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आनंदवन, आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भाग अशा विविध भागामध्ये जाऊन शिबिरांचे आयोजन करून लाखो रुग्णांना नेत्रदान देण्याचे काम डॉ. लहाने यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वतःच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्यानंतर लहाने यांच्या आईने त्यांना आपली एक किडनी दिली. या आयुष्यातील अत्यंत खडतर प्रसंगातून सावरत आता आपण अधिक जोमाने रुग्णांसाठी काम केले पाहिजे, असे त्यांनी मनोमन ठरविले. आपला जन्म संपला होता. आईमुळे आपल्याला जीवनदान भेटले. मग आता उरलेले आयुष्य अगोदरच्या पेक्षा अधिक प्रखरतेने आपण काम केले पाहिजे, असे त्यांनी ठरविले.

1999 पासून बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे दरवर्षी डॉक्‍टर लहाने दृष्टीयज्ञ घेतात. ज्यामध्ये असंख्य रुग्णांवर ते शस्त्रक्रिया करीत असतात. आजपर्यंत तेथील हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम डॉ.लहाने आणि त्यांच्या चमूने केले आहे.

रुग्णाला देव मानत, रुग्ण हेच माझे ऑक्‍सिजन आहे म्हणत डॉ.लहाने अविरत रुग्णसेवा करीत आहेत. डोळे दान करणे याबद्दल समाजात असंख्य अंधश्रद्धा आहेत. त्यामध्ये डोळे दान केले तर भुताचा जन्म मिळतो तसेच पुनर्जन्म मिळत नाही. अशा या अंधश्रद्धा ज्या माणसांना काहीच काम नसते, जे निरक्षर असतात ते असे उद्योग करतात, असे डॉक्‍टर लहाने स्पष्टपणे सांगतात.

आपल्याला आयुष्यात शत्रू असावेत कारण ते आपल्या विकासासाठी आवश्‍यक असतात. कारण शत्रू आपला आपल्यापेक्षा अधिक अभ्यास करीत असतो. तो आपल्या चुका शोधत असतो. त्या चुका आपल्यापर्यंत पोहचतात. आपण त्यात बदल करून आणखी अधिक वेगाने काम करू शकतो. इतके सरळ तत्वज्ञान डॉ. लहाने असंख्य ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून सांगत असतात.

लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. त्यांना कमी वयात चष्मा लागण्याचे एक कारण मोबाईल हे आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सकाळ-संध्याकाळ डोळ्यांना पाण्याने धुतले पाहिजे. तसेच सर्वांनी व्यायाम करणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे लहाने सांगतात.

जे.जे. या शासकीय रुग्णालयात त्यांनी अधिष्ठाता म्हणून केलेले काम खूप मोठे आहे. लाखो रुग्णांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याचे काम डॉक्‍टर तात्याराव लहाने यांनी केले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

– श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)