दृष्टीक्षेप : सर्वांच्या नजरा लागल्यात 11 डिसेंबरकडे… 

राहुल गोखले 

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे मैदान दूर नाही आणि लोकसभा निवडणुकांचे मैदानही जवळच आहे. तेंव्हा एकाचा परिणाम दुसऱ्यावर होणार हे उघड आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्कंठावर्धक असणार आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जेंव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील, तेंव्हाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील, यात काहीच शंका नाही. 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांच्या निकालांना आता केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या सर्वात मोठ्या निवडणुका आहेत. म्हणूनच त्या एका अर्थाने देशातील जनमताची दिशा कोणती हे दर्शविणार आहेत. गेली साडेचार वर्षे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आहे. जी “मोदी लाट’ 2014 आणि नंतर काही काळ कायम होती, तिचा आता अभाव दिसत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांचे निकाल केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावरील देखील जनमत स्पष्ट करणार आहेत. या पाच राज्यांपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत तर थेट कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे.

वर्ष 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी “कॉंग्रेसमुक्‍त भारता’चा नारा दिला होता. तो नारा आता ऐकू येत नाही आणि त्याची जागा कॉंग्रेसमधील घराणेशाहीच्या मुद्द्याने घेतली आहे. म्हणजेच “भारत कॉंग्रेसमुक्‍त होणार नाही’ याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजपने दिली आहे. तीन राज्यांत कॉंग्रेस-भाजप असा थेट मुकाबला असल्याने कॉंग्रेसची लोकसभा निवडणुकांची तयारी किती ही परीक्षा असेल; तर कॉंग्रेसला तुच्छ लेखणे योग्य आहे का, याविषयी भाजपची कसोटी आहे. साहजिकच 11 डिसेंबरकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तीन राज्यांत भाजपा आधीपासून प्रबळ अर्थात, मोदी आणि शहा या निवडणुकांमध्ये नेहेमीप्रमाणे आपली ताकद ओतत असले, तरीही या तीनही राज्यांत मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वीपासूनच भाजपची मोठी ताकद राहिली आहे. छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांनी तर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी दीर्घकाळ भाजपला सत्तेत ठेवण्यात यश मिळविले आहे.
राजस्थानातही भाजप अनेकदा यापूर्वी सत्तेत होता. भैरोसिंग शेखावत, खुद्द वसुंधराराजे अशांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. तेंव्हा अन्य राज्यांत जशी मोदी लाटेवर आणि मोदींच्या करिष्म्यावर सारी भिस्त असते, तशी ती या राज्यांत आहे, असे मानण्याचे कारण नाही. येथील जय-पराजयाचे बरे-वाईट श्रेय राज्यातील नेत्यांनाही जाईल. तथापि हेही खरे की, निकालांमध्ये पडणारे प्रतिबिंब केवळ त्या राज्यांतील जनमताचे नसेल; तर ते एकूण देशभरातील जनमताचेही असेल. म्हणूनच केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर जनमताची दिशा यातून स्पष्ट होईल.

मोदी-शहांचा करिष्मा आणि राम मंदिर… 

मोदी आणि शहांचा जो झंझावात वर्ष 2014 आणि नंतर काही वर्षे कायम होता तसा तो आता दिसत नाही. चलनबदलाच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा झंझावात दिसला; त्यानंतर तो फारसा दिसलेला नाही. कर्नाटकात भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. अनेक जागांवरील पोटनिवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

आता राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून संघपरिवाराने भावनिक मुद्द्याभोवती वातावरण निर्मितीचा घाट घातला असला तरी त्यात किती यश येईल हे सांगणे कठीण आहे. कारण पिढी बदलाबरोबर मुद्द्यांचे आकर्षणदेखील बदलत असते. वर्ष 1990 दशकात राम मंदिराच्या मुद्‌द्‌याला मिळालेला प्रतिसाद आता उण्यापुऱ्या तीन दशकांनंतर देखील मिळेलच, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

वास्तविक, देशविकासाचे स्वप्न मोदींनी देशाला दाखविले होते. तथापि मोदींची शैली ही एककल्ली कारभाराची असल्याने केंद्रातील मंत्रिमंडळ बहुमुखी झाले नाही आणि सक्षम सल्लागारांना देखील वाव मिळाला नाही.
श्रेय-अपश्रेयाचा मुद्दा येणारच…

करिष्मा, लाट या गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या नसतात; त्यांना काळाची मर्यादा असते. अखेर काम हेच टिकणारे असते आणि त्या आघाडीवर भाजपकडे बचावात्मक पवित्रा घ्यावा असेच चित्र आहे. साहजिकच पाच पैकी तीन प्रमुख राज्यांत जेथे दुरंगी लढत आहे तेथे प्रादेशिक नेतृत्वावर भाजपची भिस्त असल्यास नवल नाही. पण म्हणून श्रेय मोदींचे आणि अपश्रेय प्रादेशिक नेतृत्वाचे अशी सोयीस्कर विभागणी करणे देखील प्रशस्त नव्हे.

या निवडणुकांत जो काही निकाल लागेल त्याचे श्रेय प्रादेशिक नेतृत्वाचे आणि अपश्रेय आपले अशी भूमिका मोदींनी घेतली तर ती त्यांची प्रतिमा उंचावण्यास मदत करेल; पण मोदी आणि त्यांचे समर्थक असे करतील अशी शक्‍यता कमी. किंबहुना भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तर त्याचे अपश्रेय राज्यातील सरकारच्या कारभारावर फोडले जाईल आणि विजय मिळला तर त्याचे श्रेय मोदींना दिले जाईल.

लोकसभेला काय होणार…? 

पण या श्रेय-अपश्रेयाच्या द्वंद्वातून देखील एक महत्वाचा मुद्दा सुटता कामा नये आणि तो म्हणजे लोकसभा निवडणुकांना काहीच महिन्यांचा अवधी उरला आहे आणि त्यात मोदींच्या करिष्म्याची आणि मुख्य म्हणजे पाच वर्षांच्या कारभाराची कसोटी असणार आहे. तेंव्हा निवडणुकांचा निकाल काहीही काहीही लागला तरीही त्याचा अन्वयार्थ भाजपला निगुतीने काढावा लागेल. भाजपला 2014 ची पुनरावृत्ती 2019 मध्ये करता येणार नाही असे बहुतांशी मत आहे. तेंव्हा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात काय होते हे भाजपसाठी महत्वाचे आहे. या राज्यांत भाजपला विजय जरी मिळाला तरी त्याचा अर्थ भाजपला समजून घ्यावा लागेल आणि पराभव झाला तरी त्याचा योग्य बोध घ्यावा लागेल.

निवडणुकांचे निकाल हे अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळेच यशापयशाचा अर्थ समजून घेणे इष्ट असते. अनेकदा विजयातून फाजील आत्मविश्‍वास निर्माण होतो आणि पराभवातून विरोधी पक्षांविषयी तिरस्कार. हे दोन्ही टाळले आणि सम्यक विश्‍लेषण केले तर पुढील वाटचाल सुकर होण्याचा संभव अधिक. विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे या दृष्टीतून पाहिले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)