दृष्टीक्षेप: जनसंघर्ष यात्रेचे फलित आणि कॉंग्रेसची भूमिका 

अशोक सुतार 
भाजपची सत्ता आल्याने काही कॉंग्रेसजनांनी उगवत्या सूर्याला नमस्कार करत कमळाचा आधार घेणे पसंत केले तर कुणी वाट दिसेल तिकडे गेले. विद्यमान युती सरकारची कामगिरी योग्य नसल्याची टीका कॉंग्रेसमधून नेहमी व्यक्त होत असते. मात्र, ती जाहीररीत्या मांडण्यास कॉंग्रेस नेते कमी पडताना दिसत आहेत. कॉंग्रेस पक्षाने आदेश दिला म्हणून जन संघर्ष यात्रेत सहभागी व्हायचे, असे प्रकार आता चालणार नाहीत. संबंधितांना आपले काम जनतेला दाखवावेच लागेल. 
राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ कोल्हापूरपासून 31 ऑगस्ट रोजी सुरु झाला व पुण्यात समारोप झाला.
पश्‍चिम महाराष्ट्र हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सहकारसम्राटांच्या भूमीत कॉंग्रेसचा पाया भक्कम होता. नंतर शरद पवारांनी कॉंग्रेसमधून काढता पाय घेतल्यानंतर कॉंग्रेस दुभंगली. राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या काही जागा पटकावल्या.
कॉंग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, दोन्हींचे विचार एकच. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यांच्या नेत्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण करून दिले. नंतर राष्ट्रवादीने महाराष्ट्रात कॉंग्रेसशी स्पर्धा करणे सुरु केले, ती स्पर्धा इतपर्यंत आली कि – एकाच सत्तेच्या छताखाली असताना दोन्ही पक्षांत सख्य राहिले नाही. परिणामी, आपापल्या अतीव महत्त्वाकांक्षेपोटी 2014 साली आघाडीच्या पक्षांचा पराभव होऊन कधी नव्हे तो भाजप पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत आला. भाजपला अर्थातच शिवसेनेची मोठी साथ होती.
सध्या भाजपा व शिवसेनेलाही बेदिलीचे ग्रहण लागले आहे. त्याचे दूरगामी परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्‍यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 2014 ला कॉंग्रेस पक्षाला पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. मोदी सरकार व फडणवीस सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात कॉंग्रसने किती मोर्चे काढले, किती आंदोलने केली, हा प्रश्‍नच आहे. उलट विरोधकांची आक्रमकता आज सत्ताधारी भाजपमध्ये पाहायला मिळत आहे; सत्ताधारी आक्रमक होणे म्हणजे विरोधक गाफील असणे होय. जनतेच्या मनातील विरोधक पक्ष म्हणून हवी असणारी आक्रमकता कॉंग्रेसमध्ये दिसत नाही. कॉंग्रेसमध्ये घराणेशाही जोरात असल्याने (ती पूर्वीच आली आहे) ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी किती वर्ष सतरंज्या अंथरायच्या यालाही प्रमाण आहे, कार्यकर्त्यांमधून नवीन नेता तयार होणे महत्वाचे आहे.
बाहेरच्या पक्षातील आयारामाना मानाची पदे आणि जुन्या कार्यकर्त्यांना लाथाळ्या, या धोरणामुळे अनेकांनी दुसऱ्या पक्षांशी घरोबा केला, हे वास्तव विसरून चालणार नाही. आता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही सक्रिय होत आहेत; अशी चेतना नेहमीच जाणवली पाहिजे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मदार पश्‍चिम महाराष्ट्रावर आहे. या निवडणुका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही कॉंग्रेसचे बळ एकवटले की, आघाडीची सरशी होणार हा अंदाज असला तरी अंदाज आणि वास्तव स्थिती यात किती तफावत आहे, पुन्हा मोट बांधणे याचा अर्थ नीट समजावून घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी करणे महत्वाचे ठरत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाकडे किती सक्षम उमेदवार आहेत याची अचूक पारख पक्षाकडून होणे अपेक्षित आहे. काही मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने नुकसान होणार आहे; कारण पालघरच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने कॉंग्रेसचे पूर्वीचे असलेले खासदार यांनाच थेट तिकीट दिले. भाजपकडे सक्षम उमेदवार नव्हता, हे विशेष.
भाजपची राजकीय चाल कशी आहे, सत्ताधारी कुठे काय बदल करतील, याचा राजकीय अभ्यास करणे गरजेचे आहे. जिथे सत्ताधारी पक्षाचा सक्षम उमेदवार नाही, तिथे सत्ताधारी पक्ष अशी गडबड करून विरोधकांना चीत करू शकतात. त्यामुळे गटबाजी, अंतर्गत लाथाळ्या असे प्रकार हद्दपार केले तरच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पूर्वीचे वैभव प्राप्त करता येईल.
शाहूवाडीत उदयसिंगराव गायकवाड यांचे घराणे अस्तित्वाच्या शोधात आहे, राधानगरीत माजी आमदार बजरंग देसाई फारसे सक्रिय नाहीत, तर त्यांचे सुपुत्र भाजपमध्ये आहेत. मिरज राखीवमध्ये भाजपशी सामना करण्यास पक्षाकडे योग्य उमेदवार नाही; तिथे सक्षम उमेदवार शोधणे गरजेचे आहे. सांगोल्यात शहाजी पाटील शिवसेनेत गेल्याने तिथे सक्षम उमेदवाराची उणीव भासणार आहे. सोलापूर उत्तरमध्ये बाबुराव चाकोते यांच्यानंतर नीट बांधणी केली नसल्याने कॉंग्रेसला लाखाच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. अशा मतदारसंघात कॉंग्रेसला निवडून येण्यायोग्य, किमानपक्षी पक्षाची इभ्रत राखेल असा उमेदवार शोधणे गरजेचे आहे.
कॉंग्रेस आणि गटबाजी हे दोन शब्द समानार्थी असावेत की काय, इतपत बेदिली माजली आहे. एकमेकांशी सुंद-उपसुंदांप्रमाणे सतत लढणे, गट-तट पोसणे यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील 36 विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर शून्य, सांगलीत सध्या विश्‍वजित कदम (आधी दिवंगत पतंगराव कदम), साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, सोलापुरात प्रणिती शिंदे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके इतके मोजकेच कॉंग्रेसचे नेते हाताचा प्रभाव दाखवून विधानसभेत पोहोचले.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी, तर कोल्हापुरात सामूहिक प्रयत्नातून घरवापसी’चा प्रयत्न चालवला आहे.
कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासह जयवंतराव आवळे, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, सतेज पाटील या माजी मंत्र्यांनी हातात हात घालून चालण्याचा ऐक्‍याचा प्रयोग सुरू केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्याशी संवाद सुरू ठेवला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी पूर्वी केलेल्या चुका टाळायचे ठरवले तर भवितव्य उज्वल आहे. कॉंग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सक्षम असणाऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे, त्यांनाच पक्षाकडून बळ दिले जाणार आहे.
पक्षांतर्गत समन्वय ठेवण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसच्या स्तरावरून नजर ठेवली जात आहे. याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस पक्षाची स्थिती बदलत चालल्याचे दिसत आहे. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसची “जन संघर्ष’ यात्रा सुरु आहे. पण पक्षातील अंतर्गत संघर्ष प्रथम मिटवला पाहिजे. ही यात्रा करताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मरगळ झटकून आगामी निवडणुकांची मोट बांधण्यासाठी कॉंग्रेसने सज्ज झाले पाहिजे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)