#दृष्टीक्षेप : आंबेडकर-ओवेसी युतीचे भवितव्य काय?   

प्रा. अविनाश कोल्हे 
स्वबळावर लढल्यास भाजपा व शिवसेना दोन्ही पक्षांचे नुकसान होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले असतानाच, दुसरीकडे रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकरांचा भारिप व ओवेसींचा एमआयएमची युती झाल्याची खळबळजनक बातमी आली आहे. काय होतील याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर? 
आगामी लोकसभा, राज्यांतल्या विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका एकत्र लढण्याचा निर्णय आंबेडकर-ओवेसींनी घेतला आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला स्वबळावर निवडणूका जिंकता येणार नाहीत. अशी आघाडी आधीच करून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने दूरदृष्टी दाखवली आहे. आता भाजपा-सेना युतीची घोषणा झाली की, मग महाराष्ट्रात तीन आघाडयांत लढत होईल.
महाराष्ट्रात ऑक्‍टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढती झाल्या होत्या. त्यावेळी सेना-भाजपाची युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी तुटली होती. वेगवेगळे लढल्याचे तोटे लक्षात आल्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आता आधीच आघाडी जाहीर केली आहे. पण अजून सेना-भाजपाची युती व्हायची आहे. याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले असतांना प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दद्दीन ओवेसींशी युती करून खळबळ माजवली आहे. सर्वांनाच भारिप-एमआयएम युतीची दखल घ्यावी लागेल.
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असलेला भारिप-बहुजन महासंघ आणि ओवेसींच्या एमआयएमच्या युतीची शक्‍यता वर्तवण्यात येत होतीच. आता घोषणा झालेली आहे. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी आंबेडकर व ओवेसी यांची भेट होणार आहे व त्यानंतर त्याच दिवशी औरंगाबाद येथे युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे. या युतीच्या निमित्ताने तब्बल 30 वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दलित व मुस्लिम समाज राजकीयदृष्टया एकत्र येत आहे. यापूर्वी आरपीआय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे व हाजी मस्तान एकत्र आले होते व त्यांनी “दलित मुस्लिम मुक्‍ती सेना’ स्थापन केली होती. पण हा प्रयोग फार काळ चालला नाही. आता पुन्हा आंबेडकर-ओवेसी तसाच प्रयत्न करत आहेत. हे दोघेही कसबी राजकीय नेते आहेत. त्यामुळे या आघाडीचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असे आज तरी म्हणावे लागते. “आज तरी’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. याचे कारण याप्रकारे सत्तारूढ शक्‍तींच्या विरोधात आजपर्यंत उभ्या राहिलेल्या आघाड्या फार काळ टिकल्या नाहीत. एकेकाळी सत्तारूढ शक्‍ती म्हणजे कॉंग्रेस होती तर आज भाजपा आहे. पण मुद्दा तोच आहे. अशा प्रकारे सत्तारूढ आघाडीच्या विरोधात निर्माण झालेल्या शक्‍तींना राजकीय यश मिळते; पण हे यश एक तर पचवता येत नाही किंवा फंदफितुरी होऊन या आघाडया यथावकाश नामशेष होतात.
या संदर्भातले जुने उदाहरण म्हणजे “अकोला पॅटर्न’. प्रकाश आंबेडकरांनी सन 1992 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकांअगोदर विदर्भातील अकोला जिल्हयातील मराठेतर राजकीय गटांना एकत्र आणले होते. या आघाडीत अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक एका झेंडयाखाली आले होते. यात त्यांच्याबरोबर विदर्भातले मखराम पवार होते. या आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर 1993 साली मराठवाडयातील किनवट मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यात भारिप बहुजन महासंघातर्फे भीमराव केराम या फारशा प्रसिद्ध नसलेल्या आदिवासी नेत्याला उमेदवारी दिली होती. केराम यांनी कॉंग्रेसच्या एका मोठया नेत्याचा पराभव केला. तेव्हापासून हा प्रयोग “अकोला पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झाला.
“अकोला पॅटर्न’चा अभ्यास केला, तर असे दिसून येते यातील आघाडी “मराठा’ या एका जातीच्या विरोधातील होती जी महाराष्ट्रात सुमारे 40 टक्के आहे. राजकीय अभ्यासक अशा जातींना “वरचष्मा असलेली जात’ (डॉमिनंट कास्ट) म्हणतात. भारतीय संघराज्यातील काही राज्यांत अशा जाती आहेत. जेव्हा देशांत निवडणुकांचे राजकारण सुरू झाले, तेव्हा म्हणजे सन 1952 पासून सुरुवातीची बरीच वर्षे महाराष्ट्रात मराठा जातीचा वरचष्मा होता. म्हणूनच “अकोला पॅटर्न’मध्ये सर्व बिगर-मराठा राजकीय शक्‍ती एकत्र येऊ शकल्या. सन 1990 च्या दशकापासून यात बदल व्हायला लागला. आता अनेक राज्यांतील राजकीय परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे.
अशा प्रयोगांचे नंतर जे होते तेच “अकोला पॅटर्न’चे झाले. सन 1995 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अण्णा हजारेंच्या उपोषणांमुळे भ्रष्टाचारविरोधी लाट होती. मुंबई महापालिकेचे तेव्हाचे उपायुक्‍त गो. रा. खैरनार या वाचाळ अधिकाऱ्याने शरद पवारांच्या विरोधात बेफाम आरोप केले होते. “माझ्याजवळ पवारांच्या भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे आहेत,’ हे त्यांचे आवडते विधान होते. पत्रकारांनी वारंवार मागणी करूनही त्यांनी एक चिटोरासुद्धा समोर आणला नव्हता. दुसरीकडे भाजपचे गोपीनाथ मुंडे सन 1995 च्या विधानसभा प्रचारात दाऊद इब्राहिम-पवार, उल्हासनगरचे पप्पू कलानी-पवार, वसईचा भाई ठाकूर आणि पवार यांच्यात संबंध आहेत वगैरे आरोप करत महाराष्ट्र गाजवत होते. शिवाय “एन्‍रॉन प्रकरण’ होतेच. एन्‍रॉन प्रकरणात शरद पवारांनी प्रचंड पैसा खाल्ला असाही आरोप मुंडे करत असत. हे सर्व आरोप खरे आहेत असे समाजाला वाटत होते. परिणामी महाराष्ट्रात भ्रष्टाचारविरोधी वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या 1995 सालच्या निवडणुकांत केराम यांचा पराभव भाजपाच्या दिगंबर पवारांनी केला. यातून “अकोला पॅटर्न’च्या मर्यादा समोर आल्या.
एव्हाना आपले राजकारण चांगल्या अर्थाने प्रगल्भ झालेले आहे. जवळपास सर्वच विरोधी पक्षांना सत्ता मिळालेली आहे. सन 1995 पर्यंत सेना-भाजपा युती सत्तेत यायची होती, युती सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर यायचा होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. देशातील प्रत्येक राज्यात विरोधी पक्ष कधी ना कधी सत्तेत होताच. आता मतदारांना विरोधी पक्षांना सत्ता दिली की, काय होते आणि कॉंग्रेसला सत्ता दिली की, काय होते, हे व्यवस्थित माहिती झालेले आहे.
अशा वातावरणात आता आंबेडकर-ओवेसी एकत्र येण्याला वेगळे महत्त्व आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो हे वर्षभरात कळेलच. महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघात दलित मतदार निकाल फिरवू शकतात तर काही मतदारसंघात मुस्लिम मतदार असे करू शकतात. अशा आघाड्यांची सत्वपरिक्षा जागा वाटपांच्या वेळी होते. कोणते मतदारसंघ मित्रपक्षाला सोडायचे, कोणते स्वतः लढावयाचे वगैरे चर्चेंत आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागते. सन 2014 मध्ये भाजपा व सेना यांच्यातील युती तुटण्याचे कारण जागा वाटपांबद्दल समाधानकारक तोडगा निघाला नाही, हे होते. भाजपा-सेना युतीला तरी तब्बल 25 वर्षांचा इतिहास आहे. ही युती 1989 सालापासून आहे. म्हणजे यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जागा वाटपाच्या चर्चेची सवय आहे व त्यांच्याजवळ काही फॉर्म्युले आहेत. असे असूनही 2014 साली युती तुटली होती.
प्रकाश आंबेडकर व ओवेसी प्रथमच एकत्र येत आहेत. आज तरी ओवेसी “आंबेडकर आमच्या मोठया भावासारखे आहेत’ वगैरे वक्‍तव्य करत आहेत. हे मोठेपण जागा वाटपापर्यंत टिको एवढीच अपेक्षा. दलित व मुस्लिम समाजाने राजकीयदृष्टया जागरूक होण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय सोडून दिली पाहिजे. त्या दृष्टीने आंबेडकर ओवेसी यांच्या युतीचे स्वागत केले पाहिजे.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)