#दृष्टिक्षेप: बांगलादेशात वैचारिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी

 प्रा. अविनाश कोल्हे

बांगलादेश सरकारने विरोधी पक्ष नेत्या खलिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरूंगात टाकले असून त्यांना निवडणूक लढवण्यास सहा वर्षांची बंदी केली आहे. तेथे आज तरी सरकारला विरोध करू शकेल, अशी शक्‍ती दिसत नसली, तरी ही स्थिती फार काळ टिकणार नाही व लवकरच सशक्‍त पर्याय निर्माण होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

आशियाई देशांतील त्यातही खास करून “सार्क’ म्हणजेच दक्षिण आशियाई देशांत अनेक ठिकाणी लोकशाही शासनव्यवस्था स्थिर होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या व नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा शपथविधी लवकरच संपन्न होणार आहे. तसेच बांगलादेशमध्येसुद्धा या वर्षीच्या उत्तरार्धात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. नेपाळमध्ये लोकनियुक्‍त सरकार आहे, श्रीलंकेत नियमितपणे सार्वत्रिक निवडणुका होतात. कसेही असले तरी अफगाणिस्तानातही लोकनियुक्‍त सरकार सत्तेत आहे. असे असले तरी या सर्व देशांत लोकशाही संस्कृती रूजली आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित केला तर उत्तर फारसे आश्‍वासक नसेल.

लोकशाही शासनव्यवस्था म्हणजे फक्‍त पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका घेणे एवढेच अभिप्रेत नसते तर या शासनव्यवस्थेत “परमतांचा आदर’, “सशक्‍त विरोधी पक्षं’, “मुक्‍त माध्यमं’, “निर्भीड न्यायपालिका’, “सक्षम स्वयंसेवी संस्थां’ वगैरे घटक अपेक्षित असतात.

आपल्या शेजारच्या अनेक देशांतील लोकशाहीबद्दल तक्रारी ऐकू येत आहेत. बांगलादेशात वाढत असलेली सत्तारूढ पक्षाची असहिष्णुता. तेथे शेख हसिनांचे सरकार आता शाहीदूल आलम (जन्म ः 1955) या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या छायाचित्रकाराच्या मागे लागले आहे. नुकतेच आलम यांच्या ढाका येथील निवासस्थानी गुप्त पोलीस गेले व त्यांनी आलम यांना अटक केली. हे सर्व होताना पोलिसांनी त्या भागातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते आणि उपस्थितांनी या प्रसंगाचे फोटो काढू नये, असे बजावले होते. मात्र आलम यांची सहकारी रहनुमा अहमद हिने मात्र स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. या प्रसंगाने बांगलादेशच्या सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर बदनामी होत आहे. एका नामवंत छायाचित्रकाराला अटक करणे शेख हसिना सरकारला चांगलेच महाग पडत आहे.

आता असे काय घडले की ज्यामुळे बांगला सरकारला आलम यांना गजाआड करावे लागेल? जगातील इतर महानगरांत होत असतो, तसा बांगला देशची राजधानी ढाक्‍क्‍यातही वाहतुकीचा खोळंबा होता. ही तशी दररोज घडणारी घटना आहे. एक दिवस मात्र ढाका विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहनशक्‍तीचा कडेलोट झाला व त्यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या. या खोळब्यांच्या जोडीने भरधाव जाणारे ट्रक ड्रायव्हर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस होत्याच. जुलै 2018 च्या शेवटच्या आठवड्यात अशा एका भरधाव जाणाऱ्या बसने दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. मग जो भडका उडाला की, ज्याने हसिनांचे सरकार हादरून गेले.

विद्यार्थांची मागणी अगदी साधी व न्याय्य होती. त्यांना सुरक्षित व वेळेत पूर्ण होईल असा प्रवास हवा होता. पण सरकारने सुरुवातीला याकडे साफ दुर्लक्ष केले. उलटपक्षी भाडोत्री गुंडांनी बंडखोर विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ले करायला सुरुवात केली. काही लोकांनी या हल्ल्यांचे फोटो काढले व समाज माध्यमांवर टाकले. यात आघाडीवर होते सुप्रसिद्ध छायाचित्रकार शाहीदुल आलम. त्यांनी त्यांच्यासारख्या कसलेल्या अनुभवी छायाचित्रकाराने घेतलेली छायाचित्रं किती प्रभावी असतील याची कल्पनाच केलेली बरी. याचा शेख हसिना सरकारला राग आला.

एवढे कमी झाले की काय म्हणून शाहीदुल आलम यांनी “अल झजीरा’ या इस्लामी टी.व्ही. चॅनेलला मुलाखत दिली. यात शाहीदुल आलम यांनी नमुद केले की विद्यार्थ्यांची मागणी जरी सुरक्षित प्रवास एवढी होती; तरी त्यामागे अनेक प्रकारचा असंतोष दडलेला आहे. यात सरकारचा/नोकरशहांचा भ्रष्टाचार, विचारवंतांची मुस्कटदाबी, बॅंकात सतत होणारे मोठमोठे घोटाळे वगैरे सर्वांबद्दलचा राग व्यक्‍त होत आहे. (आपण आपल्या देशाबद्दल वाचतोय, असे वाटतेय ना?)
तसे पाहिले तर शाहीदुल आलम यांनी जे चित्र रंगवले ते सर्वसामान्य बांगला व्यक्‍तीला परिचयाचे आहे. बांगलादेशातही दररोज कुठे ना कुठे सरकारच्या विरोधात निदर्शनं होत असतात, “रास्ता रोको’ होत असतात. या ना त्या मार्गाने समाज आपला रोष व्यक्‍त करत असतोच. अलीकडे तर बांगलादेशात 1971 च्या मुक्‍ती युद्धात ज्यांनी बलिदान केले त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांत “आरक्षण’ दिले; तर त्याविरुद्धसुद्धा ठिकठिकाणी निदर्शनं झाली होती.

हे सर्व शाहीदुल आलम यांच्या कॅमेऱ्यात कैद केलेले आहे. शिवाय त्यांनी “अल झजीरा’ला दिलेली मुलाखत. म्हणून त्यांना अटक केली व अजूनही ते तुरुंगातच आहेत. त्यांना बांगलादेशातील पोलिसांनी अटक केली आहे. एका विशिष्ट कायद्याच्या तरतुदीचा वापर करून तेथील सरकार शासनाच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शाहीदुल आलम आता रिमांडवर आहेत.

संयुक्‍त राष्ट्राने या सर्व घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा अटकेतून बांगलादेशचे सरकार निःस्पृह बाण्याच्या लेखक कलावंत विचारवंतांना दहशतीखाली घेण्याचा प्रयत्न करत आहे. बांगला देशात गेली दहा वर्षे अवामी लीग या पक्षाचे सरकार आहे व पंतप्रधानपदी श्रीमती शेख हसिना आहेत. बांगला देशातील लोकशाही शासनव्यवस्थेचा आजवरचा इतिहास बघता तेथे दर पाच वर्षांनी सत्तांतर होत असे.

मात्र तेथील सत्ता भारतविरोधी ‘बांगला नॅशनल पार्टी’ व भारतप्रेमी “अवामी लीग’ यांच्यातच फिरत असते. बांगलादेशात जेव्हा लोकशाही नसते तेव्हा तेथे लष्करशाही असते. आता तेथे 2008 साली अवामी लीगच सत्तेत आहे. या पक्षाचा कारभार तितकासा चांगला नाही. या पक्षाला या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका जड जातील अशी भीती आहे. परिणामी हसिना यांचे सरकार अधिकाधिक असहिष्णू बनत चालले आहे, अशी टीका होत असते.

शाहीदुल आलम यांची अटक एका प्रकारे प्रतीकात्मक आहे. गेले काही महिने बांगलादेशात पोलीस अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत. मागच्या काही महिन्यांत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सुमारे 200 जण मारले गेले आहेत. त्याचप्रमाणे हजारो लोकांना देशविरोधी कारवाया केल्याबद्दल अटक झाली आहे. पण महिनोन्‌महिने त्यांच्यावर खटले दाखल केले जात नाहीत. आता तर सरकार विद्यार्थी व शहादुल आलम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारामागे लागले आहे.

काही अभ्यासकांच्या मते, हे सरकार शहादुल आलम यांच्यासारख्या अनेक अटक करून एक प्रकारचा संदेश देत आहे की, जेथे आलम यांच्यासारखे नामवंत सुरक्षित नाहीत, तेथे इतरांची काय पत्रास? दुसरे म्हणजे बांगला देशात शहादुल आलम यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले लेखक, चित्रकार, कवी, पत्रकार फारसे नाहीत. आलम यांच्यासारख्या कलाकाराची मुस्कटदाबी करणे केव्हाही अवघडच. म्हणूनच सरकार त्यांना येनकेन प्रकारे गप्प करण्याचे प्रयत्न करत आहे.
शेख हसिना यांना कोणी तरी भारतात 1975 ते 77 दरम्यान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या अंतर्गत आणीबाणीचा अनुभव सांगायला हवा. या आणीबाणी सरकारने समाजातील अनेक घटकांवर अनन्वित अत्याचार केले होते.

नंतर 22 महिन्यांनी जेव्हा सार्वत्रिक निवडणुका आल्या तेव्हा याच जनतेने इंदिरा गांधींनी खडे चारले होते. अर्थात, भारतातील लोकशाही व आज बांगलादेशात असलेली लोकशाही यांच्यात गुणात्मक फरक आहे. भारतावर तेव्हा व आजही सरकारविरोधी वारं शिडात घ्यायला विरोधी पक्षांची आघाडी होती. तशी बांगलादेशात आज तरी दिसत नाही. हेच तिथले मुख्य दु:ख आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)