#दृष्टिक्षेप: “नशे’च्या कुबड्यांवर किती काळ चालणार? 

संग्रहित छायाचित्र
जयेश राणे 
गुजरातनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात हुक्‍का पार्लरवर बंदी आणली आहे. याविषयीची अधिसूचना गृहविभागाने जारी केली आहे. मुंबईतील लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर 2017 मध्ये हुक्‍का पार्लरमुळे आग लागून 14 लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये नागपूर अधिवेशनात विधिमंडळात हुक्‍का पार्लर बंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यंदाच्या एप्रिल महिन्यात हे विधेयक विधमंडळात पारित झाले. 
नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक कलह आणि अभ्यास यांतून निर्माण होणारा ‘ताण’ हलका करण्यासाठी बहुतांशजण धूम्रपान, तंबाखू, मावा, हुक्‍का, मद्यपान, काही औषधांच्या गोळ्या-सिरप आदी गोष्टींचा कुबड्यांप्रमाणे ‘आधार’ घेतात. तरुणपणातच वयोवृद्ध, अशक्‍त दिसणारी तरुणाई घातकी व्यसनांचाच परिपाक आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक कितीही हुशार आणि यशस्वी असले तरी या व्यक्ती निर्व्यसनी आहेत का? या प्रश्नाचे उत्तर निश्‍चितच समाधानकारक नाही. कारण चढाओढीच्या युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दीर्घकाळ कार्यरत राहाता यावे यासाठी व्यसनाच्या आहारी गेलेल्या मंडळींची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच विवाह जमवताना मुलगा “निर्व्यसनी’ हवा अशी आग्रही मागणी केली जाते.
हुक्‍का पार्लरकडे अधिकांशपणे अनेक श्रीमंत मंडळींची मुले, मुली यांची पावले वळायची. विविध फ्लेवर्समधील हुक्‍याची नशा करण्यासाठी मुक्तपणे पैशांची उधळण होत होती असल्याने हक्‍का पार्लर म्हणजे अल्पावधीत बक्कळ कमाई करण्याचे साधनच बनले होते. महाविद्यालयापेक्षा याठिकाणी अधिकांशपणे असणारी युवा वर्गाची हजेरी लक्षवेधी ठरत होती. त्यामुळे एक घातक व्यसन आणि त्या व्यसनाचे केंद्र बनलेल्या हुक्का पार्लरवर टाच आणणे अनिवार्यच होते. मुंबईतील दुर्घटना घडली नसती, तर हुक्‍का पार्लर बंदी लागू केली असती का ?
ज्या गोष्टींवर बंदी आणली जाते, असते त्या गोष्टी मागच्या दरवाज्याने चढ्या दराने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. बंदीच्या माध्यमातून अधिकृतपणे हुक्‍का पार्लरवर बंदी आणली आहे, तरी काही कालावधीनंतर हुक्का घेण्यासाठी व्यसनी व्यक्तींचे नेटवर्क सक्रिय होणार नाही किंबहुना त्यांना तशी संधीच मिळणार नाही, अशा प्रकारे त्यांची कोंडी करणे आवश्‍यक आहे.
हुक्का किंवा अन्य कोणतेही घातकी व्यसन हे शरीराची “चाळण’च करत असते. जोपर्यंत शरीराची प्रतिकार क्षमता सशक्त असते तोपर्यंत विविध व्यसनांच्या आहारी जाऊन शरीराची प्रतिकार क्षमताच नष्ट केली जाते. ही क्षमताच लयास गेल्यावर ती पुन्हा प्राप्त करणे अत्यंत अवघड असते. व्यसनाधीनतेमुळे शरीरातील पेशीच कमकुवत होत असल्यामुळे त्यांची नव्याने त्या शरीरात पुन्हा वाढ होणे कठीण असते. व्यसनातून मिळणारे क्षणिक सुख विचारात घेतले जाते. पण त्याचे गंभीर दुष्परिणाम विचारात घेतले जात नाहीत. अन्न ग्रहण केल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर शरीर कार्य करत असते. आहार म्हणून शरीरासाठी अन्नाचा विचार केला जात नाही. तर त्याऐवजी अन्न म्हणून शरीरावर व्यसनासाठी आवश्‍यक गोष्टींचा मारा केला जातो. परिणामी त्या शरीराला अन्न पचनी पडत नाही. धडधाकट व्यक्तीला व्यसन शारीरिक, मानसिक दृष्ट्‌या बलवान करत नाही. तर ते त्याला स्वत:च्या अधीन ठेवते. यामुळेच व्यसनी व्यक्तींना व्यसन करावेसे वाटल्यावर ते साधन मिळाले नाही, तर त्यांना काही सुचेनासे होते. व्यसन केल्यावरच ते पुन्हा वेगाने काम करू लागतात. यामुळे कमवलेले पैसे व्यसनावरच अधिक खर्च होत असतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्य्‌ा तोट्यात नेणाऱ्या व्यसनाच्या अधीन राहून विनाशाकडेच वाटचाल सुरूच राहते.
व्यसनाधीनतेपासून समाजाला परावृत्त करण्यासाठी सरकारने काही नियम सिद्ध केले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यावर दंडही आकाराला जातो. अशा व्यक्तींना कॅन्सर रुग्णालयांत घेऊन जाण्याच्या दृष्टीने सरकारने विचार केल्यास उत्तम. प्रायोगिक स्तरावर हा भाग करून पाहिल्यावर किती जणांचे व्यसन किती कालावधीत सुटले, अल्प झाले अशी आकडेवारी कळेल. पुडीवर केवळ छायाचित्र पाहणे आणि प्रत्यक्ष त्या स्वरूपातील व्यक्ती पाहणे यांत पुष्कळ फरक आहे. गंभीर दुष्परिणाम स्वतः पाहिल्याविना मनामध्ये व्यसन सोडण्याची प्रक्रिया चालू होणार नाही. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केल्यास फलनिष्पत्ती चांगली असेल. यासाठी सामाजिक संस्थांचे साहाय्य घेता येईल.
बंदी असलेल्या गोष्टी अवैधपणे उपलब्ध होत असतात. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी संघटितपणे उठाव करून बंदी असलेल्या गोष्टींचा मार्ग समूळ नष्ट करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. यामुळे त्यांचा प्रसार करण्याचा विचार करून मोक्‍याच्या, छुप्या ठिकाणी बस्थान मांडू पाहणाऱ्यांना जरब बसेल. सरकार नियम, कायदा यांच्या माध्यमातून बंदीची कार्यवाही करत असते.
सोशल मीडियावर अनेक मंडळी सक्रिय आहेत. त्यामुळे अनेक विषयांवर येथे चर्चाही होत असतात. त्यामुळे अवैधपणे उपलब्ध होत असलेल्या गोष्टी समाजातून वेगाने हद्दपार होतील.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)