दूरध्वनीवरून आसारामचे भक्तांना उद्देशून संबोधन !

जोधपुर – तुमचा बापू निश्‍चीतच कारागृहातून बाहेर येईल आणि आपल्याला चांगले दिवस नक्की परत येतील असा विश्‍वास वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम याने आपल्या भक्तांना दिला आहे. त्याच्या साबरमती येथील साधकाशी फोनवरून झालेल्या संभाषणात त्याने हा विश्‍वास व्यक्त केला असून त्यात त्याने आपल्या भक्तांना उद्देशून काही प्रवचनही दिले आहे. त्याच्या या संभाषणाची क्‍लीप सोशल मिडीयावरूनही व्हायरल झाली आहे.

त्याचे हे संभाषण कारागृह अधिकाऱ्याच्या अनुमतीनेच शुक्रवारी दुपारी झाले आहे. कैद्यांना दोन विशिष्ट क्रमांकावर महिन्यातून सुमारे 80 मिनीटे संभाषण करण्याची अनुमती दिली जाते. त्याच्या आधारे त्याने साबरमती आश्रमातील एका साधकाशी फोन वरून बोलताना आपल्या भक्तांना उद्देशून हे पंधरा मिनीटांचे प्रवचन दिले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, काही जण आपल्या आश्रमांची बदनामी करून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांच्या या प्रचाराला बळी पडू नका. आश्रमाच्या लेटरहेडवरून काहीही तुम्हाला सांगितले गेले तरी त्यावर विश्‍वास ठेऊ नका.

आसाराम याच्या बरोबरच शिल्पी आणि शरदचंद्र नावाच्या त्याच्या दोन शिष्यांनाही 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यांच्या विषयी आसारामने म्हटले आहे की पहिल्यांदा या दोघांच्या सुटकेसाठी मी प्रयत्न करीन. आपल्या मुलांचे रक्षण करणे हे कोणत्याही पालकाचे कर्तव्य असते. त्यासाठी वकिलांची जादा फौज द्यावी लागली तरी त्याची व्यवस्था होईल असेही त्याने यात म्हटले आहे. आपल्याला झालेल्या शिक्षेबद्दल त्याने म्हटले आहे की, खालच्या कोर्टाकडून काही चूक झाली असली तरी अशा चुका दुरूस्त करण्यासाठी वरीष्ठ न्यायालये आहेत. तेथे या निकालाची चूक दुरूस्त होईल. सत्य झाकले जाऊ शकत नाही आणि असत्याला पाय नसतात असे नमूद करून त्याने म्हटले आहे की आपल्यावर काय आरोप आहेत याला फार महत्व नाही. चांगले दिवस नक्कीच येतील असेही त्याने म्हटले आहे. या संभाषणाच्या शेवटी त्याने फोन आपला सहकारी शरदला दिला त्यावेळी त्याने आमच्या कारागृहातील वास्तव्याबाबत चिंता करू नका, चिंता करण्यासारखे येथे काही नाही असेही त्याने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)