दूध स्वीकृतीचा निकष शेतकरीविरोधी

गुलाबराव डेरे यांचा आरोप; सरकारी धोरणामुुळेच दुधात भेसळ

प्रभात वृत्तसेवा

नगर – राज्य सरकारचा 3.5 स्निग्धांश (फॅट) व 8.5 उष्मांक (एसएनएफ) दूध स्वीकृती संदर्भातील निर्णय हा पूर्णतः शेतकरी व ग्राहकांच्या विरोधातला आहे, असा आरोप दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केला आहे. सरकारच्या या निकषामुळे दुधात भेसळीला प्रोत्साहन मिळते तसेच दूध उत्पादकांनाही कमी पैसे मिळतात, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानक संस्थेने गायीच्या दुधाच्या गुणप्रतीसाठी 3.2 टक्के फॅट व 8.3 एस.एन.एफ. असे सुधारित मानक ठरविले आहे. असे असताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध दराची रचना पाहिली, तर 3.2 टक्के फॅट व 8.3 टक्के एसएनएफसाठी 26 रुपये दर पडतो. याचा अर्थ राज्याच्या किमान 27 रुपये दराला काहीही अर्थ राहत नाही. जर्शी आणि होस्टेन गायीच्या दुधाला साडेआठ टक्के उष्मांक मिळत नाही, असे निदर्शनास आणून डेरे यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकारने 3.2 टक्के स्निग्धांशाचा व 8.3 टक्के उष्माकांचा निकष लागू करून तसा आदेश काढला होता; परंतु राज्य सरकारने खासदी दूध लॉबीच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारचा आदेश गुंडाळून ठेवून नवीन निकष लागू केले. खासगी दूध संघाच्या लॉबीने एक ऑगस्ट 2018 रोजी जे दरपत्रक काढले होते, तेच दर पत्रक सरकारने 20 ऑगस्टला मान्य केले. याचा अर्थ खासगी दूध लॉबीच सरकार चालवते.
राज्य सरकारने साडेआठ उष्माकांचा निकष लागू करताना 8.3 टक्‍क्‍यांचे दूध स्वीकारण्यास मान्यता दिली; परंतु त्याचा दर कमी केला. साडेआठ टक्के उष्मांकाच्या खालचे दूध खरेदी केले, तर प्रत्येक पॉईंटला एक रुपया दर कमी केल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधात भेसळ करण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देत असल्याचा आरोप डेरे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की दरकपात फार मोठी असल्याने शेतकऱ्यांना साडेआठ उष्माकांच्या निकषपूर्तीसाठी भेसळीकडे वळावे लागते. लोक साखर, मीठ, तेल, कॉस्टिक सोडा व कमी दर्जाची पावडर, युरिया, शाम्पू यांसारखे हानीकारक पदार्थ दुधात घालतात. त्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरेल, असा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खरेदी व विक्री दरातील तफावत कमी करा

केंद्र व राज्याने 3.2 टक्के स्निग्धांश व 8.3 टक्के उष्मांक हे दूध विक्रीसाठीचे निकष केंद्र व राज्याने लागू केले आहेत. मग 8.5 टक्के उष्मांकाचा आग्रह कशासाठी असा सवाल करून डेरे म्हणाले, की 3.2 टक्के फॅट व 8.3 टक्के एसएनएफच्या दूध खरेदीसाठी 22 रुपये दहा पैसे दर मिळतो. तोच विक्रीचा निर्धारित दर ग्राहकांसाठी 45 ते 50 रुपये प्रतिलिटर एवढा आहे. खरेदी व विक्रीच्या दरात 22 रुपये एवढी मोठी तफावत पडते. प्रक्रियेसाठी सरासरी आठ-दहा रुपये एवढा खर्च होवू शकतो. ही तफावत कमी करण्याची आवश्‍यकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)