दूध प्रश्‍न सोडविण्यास सरकार अपयशी ः देशमुख

संगमनेर – भाजप सरकार सत्तेत येऊन पाच वर्षे पूर्ण होत आली तरी जनता मात्र त्रस्तच आहे. सामान्य नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारने घेतला नाही. उद्योगपती धार्जिण्या या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाणीच नसून, दूध प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
घारगाव येथे राजहंस दूध स्टॉलचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले; त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जि. प. कृषी विभागाचे सभापती अजय फटांगरे, दूध संघाचे संचालक सुभाष आहेर, तुळशीराम भोर, अरुण वाघ, सरपंच सुरेश कान्होरे, अरुण वाघ, रमेश आहेर, गोकुळ कहाणे, सर्जेराव ढमढेरे, नाना भालके, शांताराम तागडकर, अशोक गाडेकर, विठ्ठल गाडेकर, रामदास आभाळे, गणेश डोंगरे, शांताराम गाडेकर, कर्पे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, “”वाढीव दुधाची परिस्थिती हाताळता न आल्यामुळे दुधाच्या दरावर परिणाम झाला आहे. दुधाचे खरेदी-विक्रीचे दर पूर्वी शासन ठरवत होते. त्याकाळी शासनाचा सहभाग हा दुधाची खरेदी, विक्री, पावडर निर्मिती यामध्ये होता. त्यामुळे शासनाने निश्‍चित केलेल्या भावाप्रमाणेच दूधउत्पादकाला दर मिळत होते. काळाच्या ओघात शासनाने दूध विक्री, खरेदी तसेच पावडर निर्मितीमधून आपला सहभाग कमी केला. सद्यस्थितीत दूध व्यवसायात 30 टक्‍के सहकार, सुमारे 68 टक्‍के खासगी व अवघा 2 टक्‍के शासनाचा सहभाग आहे. त्यामुळे दूध व्यवसायावर शासनाचे नियंत्रण कमी झाले आहे. सरकारला दुधाचा प्रश्‍न सोडविण्यास वेळ नाही. समृद्धी महामार्ग करण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत. मात्र, दुधाला चांगला भाव देण्यासाठी पैसे नाहीत.” शासन अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असून, राज्य सरकार दुधाचा प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या वेळी पसिरातील दूधउत्पादक शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)