दूध दरात घसरण; दावणी झाल्या रिकाम्या

कळस- गाय आणि म्हशीचे दूध दर उतरल्याने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादन करणारे जनावरांच्या गोठ्यांचे मालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गोठा मालकांनी तर जनावरांना बाजारचा रस्ता दाखवत दावणी रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात दुभत्या जनावरांच्या किंमतीही 20 ते 25 हजार रूपया पर्यंत उतरल्या आहेत. तर, बळीराजाला पर्यायच नसल्याने नुकसान सहन करीत जनावरांचे पालन-पोषण करावे लागत आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोड म्हणून पशुपालन व्यवसाय निवडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारासमोर हमखास दोन-चार जनावरांची दावण असते. शिवाय, तरूण वर्गही दूध व्यवसायाकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक गावागावांत जनावरांचे गोठे तयार झाले. पण दुधाचे दर उतरल्याने उत्पादन आणि खर्चात प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरूवात केली आहे.
यापूर्वी गायीच्या दुधाला गुणवत्तेनुसार 20 ते 26 रूपये दर मिळत होता. पण, सध्य स्थितीला 16 ते 18 रूपये प्रतिलिटरला दर मिळत आहे. त्यामुळे गायींच्या दूध दरात आठ ते नऊ रूपयांची घसरण झाली आहे. म्हशीच्या दूध दराला यापूर्वी गुणवत्तेनुसार सरासरी 30 ते 40 रूपये दर मिळत होता. पण, म्हशीच्या दूध दरातही आठ ते दहा रूपयांनी घसरण झाली असून सध्या 25 ते 30 रूपयापर्यंत दर मिळत आहे. दुधाचे दर घसरले आहेत. अशातच जनावरांच्या खाद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गोळीपेंढीमध्ये 50 ते 100 रूपयांनी वाढ झाली आहे. तर कडब्याचा दर 1800 ते 2700 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान, कळस गावातील शेतकरी बारामती, राशीन, कष्टी येथून जनावरांची खरेदी विक्री करीत असतात. मात्र, सध्या परिस्थितीत या बाजारात ही तफावत आढळून आली आहे. दूध उत्पादकांनी जनावरे विक्री करणेच पसंत केले असल्याने आज गोठ्याच्या माध्यमातून दूध उत्पादन घेणारे गोठे जनावराविना ओस पडत चालले आहेत.

  • जनावरांच्या किंमती उतरल्या
    दूध दर उतरल्याने शेतकऱ्यांना जनावरे सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोठा मालकांना तर मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जनावरांचे उत्पादन आणि खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे जनावरांना बाजारचा रस्ता दाखविण्यात येत आहे. यामध्ये गोठा मालकांनी तर, जनावरे विक्री करणेच पसंत केले आहे. त्यामुळे यापूर्वी 50 ते 100 जनावरे असणाऱ्या गोठ्यात सध्या 10 ते 20 जनावरे राहिले आहेत. जनावराच्या बाजारात जनावरांची आवक वाढली आहे. त्यामुळे म्हैस दरात 15 ते 20 आणि जर्सी गायीच्या दरात 10 ते 18 हजार रूपयांनी घसरण झाली आहे.
  • शेतकरी दुय्यम म्हणून दूध व्यवसाय करतो. आज जनावरांच्या किंमती लाखाच्या घरात गेल्या आहेत. पण, दुधाला पाण्यापेक्षा दर कमी मिळत आहे. बाजारात 20 रूपयाला एक लिटर शुद्ध पाण्याची बाटली मिळते. पण, आमच्या गायीच्या दुधाला 14 ते 18 रूपये दर मिळतो, त्यामुळे जनावरांचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न पहाता जनावरे सांभाळणे आवघड झाले आहे. आमच्या दावणीला आठ ते जनावरे होती. पण, उतरलेले दुधाचे दर आणि जनावरांचा खर्च पहाता आज दावणीला दोनच जनावरे ठेवणे पसंत केले आहे.
    – दादा राजेभोसले, दूध उत्पादक शेतकरी, कळस
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)