दूध उत्पादकांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान

दुग्ध संस्थांच्या माध्यमातून होणार अंमलबजावणी


दूध भुकटी प्रकल्पधारकांनाही निर्यातीस प्रोत्साहन अनुदान


पिशवीबंद दुधाला अनुदान नाही

मुंबई – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या 5 रुपये अनुदानाचा लाभ देण्याच्या अटीवर सहकारी व खासगी दूध संस्थांना राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गाय दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासूनच होणार आहे.
दुधाला अनुदान मिळावे, यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारले होते.

या पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या प्रश्नी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच दुग्ध संस्था आणि दूध भुकटी प्रकल्पधारकांशी अनेक बैठका घेतल्या. राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूध रुपांतरणास 5 रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-

त्यानुसार सहकारी व खासगी दूग्ध संस्थांनी शेतकऱ्यांना 3.2 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधासाठी 24.10 रुपये दर देणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये 19.10 रुपये दुग्ध संस्थेचे, तर 5 रुपये शासनाचे अनुदानाचा समावेश असणार आहे. 3.3 टक्के फॅटच्या दुधास 24.40 रुपये (19.40 रुपये + 5 अनुदान), 3.4 टक्के फॅटच्या दुधास 24.70 रुपये (19.70 रुपये + 5 रुपये अनुदान) आणि 3.5 टक्के फॅट गुणप्रतीच्या दुधास 25 रुपये (20 रुपये + 5 रुपये अनुदान) प्रतिलीटर असा दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दूध प्रकिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहिल. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट 2018पासून वरील प्रमाणे प्रतिलिटर खरेदी दर अदा करित असल्याबाबतचे हमिपत्र/बंधपत्र संबंधीत प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्‍यक राहणार आहे.

शेतकऱ्यांना/दूध उत्पादकांना आजच्या शासन निर्णयानुसार निश्‍चित केलेला दर देणे बंधनकारक राहील. मात्र, दुग्ध व्यवसायात ऍडव्हान्स, पतसंस्थांचे कर्जहप्ते, पशुखाद्यापोटी येणे, स्टोअरमधील इतर साहित्याची येणी आदी करिता कपात करुन दूध बिलाची अदायगी करण्यात येत असल्याने अशा प्रकारे कपात करण्यास मुभा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)