दूध अनुदान योजनेला मुदतवाढीची “साखर’

31 जानेवारीपर्यंत योजना लागू : शासनाकडून परिपत्रक

पुणे – गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ही योजना आता 31 जानेवारी 2019 पर्यंत लागू होणार आहे. यामुळे घसरलेले दुधाचे दर पुन्हा सावरतील व त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

राज्यात दुधाचे दर घसरल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेत शासनाने 3.5 फॅट व 8.5 “एसएनएफ’ गुणप्रतिच्या पाऊच पॅकिंग व्यतिरिक्तच्या गायीच्या दुधाला प्रति लिटरला 25 रुपये दर निश्‍चित केला. त्यामध्ये लिटरला 5 रुपयांचे अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांना देण्याचे निश्‍चित होऊन 1ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत योजना सुरू राहिली. त्यानंतर ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत कुठलाही शासकीय आदेश हा दुग्धविकास खात्याला मिळाला नसल्याने विभागाने योजना बंद झाल्याचे दूध संघांना कळविले होते. परिणाम दुधाचे दर तातडीने घसरून पुन्हा 18 ते 20 रुपयांपर्यत आले होते. अनुदानाचे पैसे मिळत नसल्याने दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लिटर 25 रुपये दर देणे बंद केले होते. त्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणी आला होता.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर या योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी दूध संघांकडून होत होती. त्याबाबतचे निवेदन मंत्री महादेव जानकर यांना देण्यात आले होते. यावेळी जानकर यांनी या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ, असे जाहीर केले होते. पण, परिपत्रक शासनाकडून काढले नव्हते. शनिवारी मात्र याबाबत शासनाने परिपत्रक काढून ते राज्यातील सर्व दूध संघांना पाठविले आहे. त्यामुळे आता दुधाला पुन्हा 25 रुपये लिटरचा दर मिळणार आहे.

सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वाटप
या योजनेतील अनुदानाची रक्कम ही खूप संथ गतीने मिळत असल्याचा आरोप दूध संघांनी केला आहे. पण, शेतकऱ्यांचा पूर्ण डेटा आमच्याकडे यायला उशीर होत असल्याने अनुदान वितरित करण्यात अडचणी येत आहेत. त्यात सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित अनुदान देण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)