दूधदराच्या मुद्यावर संघ अजूनही ठाम

अफवांवर विश्‍वास ठेवू नये

पुणे – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये भाव देण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या योजनेतून अद्याप डेअरी चालक बाहेर पडलेले नाहीत तरी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघांच्यावतीने देण्यात आले आहे. दरम्यान आश्‍वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

दोन दिवसांपूर्वी संघाच्या वतीने बैठक घेण्यात आली. यात राज्य शासनाकडून अनुदान मिळत नसल्याबद्दलच्या तक्रारी आल्या होत्या; पण या योजनेतून बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय झाला नव्हता. तरीसुद्धा ग्रामीण भागात दूध संघ शासनाच्या योजनेतून बाहेर पडणार त्यामुळे दुधाचे दर घसरणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे दूध संघाने स्पष्टीकरण दिले आहे.

राज्य शासनाशी झालेल्या चर्चेनुसार हिशेब सादर केलेल्या प्रकल्पांना येत्या 6 ऑक्‍टोबरपर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास आम्ही 9 ऑक्‍टोबरला एकत्र येणार आहोत. याच दिवशी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे प्रतिनिधी आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये भाव देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार डेअरीचालकांनी शेतकऱ्यांना भाव वाढवून दिलेले आहेत. प्रतिदिन किमान 40 लाख लिटर्स दुधाची जादा भावाने खरेदी केल्यामुळे किमान 120 कोटी रुपये अडकून पडले आहेत. हे पैसे प्रथम द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)