दुहेरी हत्याकांडानंतर जामखेड बंदची हाक

अहमदनगर : अहमदनगरमधल्या गोळीबाराचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. जामखेडमध्ये गोळीबार करुन योगेश आणि राकेश राळेभात या भावांची हत्या करण्यात आली. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा जिल्हा सरचिटणीस होता. दरम्यान, दुहेरी हत्याकांड प्रकरणी आज जामखेड बंद पुकारण्यात आला आहे. अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गोळीबारानंतर दोन्ही जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय उपचार उशिरा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. यानंतर जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांना आक्रोश केला.

मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवल्यावर पालकमंत्री राम शिंदे रुग्णालयात आले. मात्र संतप्त जमावाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी जमावाने अर्वाच्च्य भाषा करत घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर पालकमंत्र्यांनी रुग्णालयाच्या मागील दाराने काढता पाय घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. गोळीबार कोणी आणि का केला याबाबतचा तपास सुरु आहे. फॉरेन्सिकने नमुने घेतले आहेत.

पूर्व वैमनस्यातून ही हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना घटनेचे काही धागेदोरेही सापडल्याची माहिती आहे. शिवाय दुपारपर्यंत एखाद्या आरोपीला अटकही केली जाऊ शकते. मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)