दुहेरी हत्याकांडातील आरोपींना मटन अन्‌ चिकनचे जेवण

जामखेड पोलिसांच्या आशीर्वादाने आरोपींची तुरुंगात मौजमजा
दुसऱ्या तुरुंगात आरोपींना हलविण्याची मयतांच्या नातेवाईकांची मागणी
जामखेड – संपूर्ण नगर जिल्ह्यासह राज्याला हादरून सोडणाऱ्या जामखेडमधील योगेश राळेभात व राकेश राळेभात या भावांच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी तुरुंगात मौजमजाच करीत आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने या आरोपींना दररोज मटन व चिकनचे जेवण पुरविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मांसाहारी जेवणाचे डबे आरोपींना देताना गुरुवारी रात्री हत्याकांडात मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांनी रंगेहाथ पकडले.
या नातेवाईकांनी तातडीने तहसीलदारांना घटनेची माहिती देऊन आरोपींना देण्यात आलेल्या जेवणाच्या डब्यांचा पंचनामा करण्यास भाग पडले. अखेर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हत्याकांडात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलिसांची चोरी समोर आणली आहे.
दि. 28 एप्रिल रोजी जामखेड शहरातील बीड रस्त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या भावांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भरचौकात व वर्दळीच्या ठिकाणी ही हत्या करण्यात आल्याने शहर हादरले होते. या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या हे आरोपी येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आरोपीप्रमाणे वागणूक न मिळता सर्व सुविधा व बाहेरचे जेवण दिले जाते. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आरोपी जेलमध्येच मजा करीत असल्याची तक्रार यापूर्वीच कृष्णा राळेभात यांनी लेखी स्वरूपात तहसीलदारांकडे केली होती. मात्र, याची दखल तुरुंगाधिकाऱ्यांनी घेतली नाही.
जेलमध्ये या आरोपींना शाही जेवण मिळत असल्याची खात्रीलायक माहिती मयतांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार कृष्णा राळेभात व नातेवाईक पाळत ठेवून होते. त्यानुसार दि. 28 जून रोजी रात्री 10 वाजता सुदाम राऊत व गणेश बीडकर हे जेलमधील कैद्यांना जेवणाचे डबे घेऊन आले. जेवण देणारा ठेकेदार रमेश पिसे याच्यामार्फत जेवण देत असताना जेलच्या प्रवेशद्वारावरच पकडले. त्याच्याकडे असलेल्या डब्यांच्या पिशवीची तपासली केली असता, डब्यात सुक्के उकडलेले चिकन व रश्‍याचे भरलेले पाच डबे आढळून आले.
मयतांच्या नातेवाईकांनी तातडीने तहसीलदारांना घटनास्थळी बोलावून या डब्यांचा पंचनामा करण्याचा आग्रह धरला. मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने तहसीलदारांनी देखील सर्वांच्या समक्ष पंचनामा करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
मुख्य आरोपी कैलास माने हा आजारपणाचे कारण दाखवून पुणे येथे खासगी रुग्णालयात मौजमजा करत आहे. तो तंदुरूस्त आहे की नाही याबाबत प्रशासनाने काहीही पाठपुरावा केला नाही. या खटल्यातील आरोपी जामखेड तुरुंगात असल्याने ते मौज करत आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना येथून स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा हे आरोपी येथे राहिल्यास ते काहीही करू शकतात. त्यामुळे आम्हाला धोका होऊ शकतो, असा लेखी अर्ज कृष्णा राळेभात यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिला आहे. नाईकवाडे यांनी पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश दिले असून, यात दोषी आढळून आलेल्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे नाईकवाडे यांनी स्पष्ट केले.

पिस्तूल विकणारा मध्यप्रदेशमध्ये अटक
जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात पिस्तूल विक्री करणाऱ्या विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय 42, रा. आंबेडकरनगर, सेंदवा, जिल्हा बडवानी, मध्यप्रदेश) याला जामखेड पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याला विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा याने पिस्तूल पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याने पिस्तूल गायकवाड याला विकले होते व त्याच पिस्तुलातून गायकवाडने मयत योगेश राळेभात याच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांना तपासात फक्त विनोद असे नाव माहिती होते. मात्र, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. कॉ. गणेश गाडे, बेलेकर यांचे पथक मध्यप्रदेशला पाठविण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी तीन दिवस मोठ्या शिताफीने तपास करून दि. 29 रोजी यातील पिस्तूल विक्री करणाऱ्या विनोदकुमार अंग्रेजबाबा याला ताब्यात घेऊन आज सकाळी जामखेड पोलीस ठाण्यात आणले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)