दुष्काळ निवारणासाठी कृतिआराखडा

पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतला तयारीचा आढावा

नगर: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आणि सवलतींचा लाभ सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मिळावा. दुष्काळ निवारणासाठी तयार केलेल्या कृतिआराखड्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिले. जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम उपस्थित होते. पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या कृतीआराखड्याचा आढावा घेतला. याशिवाय प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि सध्याची चारा उपलब्धता लक्षात घेऊन त्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. चारानिर्मितीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत बियाणे वाटप करणे आणि गाळपेर जमिनीवर चारा तयार करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.


टंचाईसाठी 67.33 कोटींचा कृतिआराखडा

जिल्ह्यात 261 गावे आणि 1 हजार 358 वाड्या वस्त्यांना 325 टॅंकर्सच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय 58 विहीरींचे अधीग्रहण करण्यात आले आहे. विहिरी खोल करणे, विहीर अधीग्रहण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर आणि तात्पुरत्या नळ योजनांची कामे हाती घेणे अशा उपाययोजनांचा 67.33 कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. पैकी 5 नळयोजना पूर्ण करण्यात आल्या असून 11 योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.


उपाययोजनांमध्ये सवलतींवर जोर

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ 69.47 टक्के एवढ्याच पावसाची नोंद झाली. अकरा तालुके आणि 2 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.


पाणी तलावातील पाणीसाठा घटला

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा केवळ 42.86 टक्के एवढा आहे तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा केवळ 14.99 टक्के एवढा आहे. कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा हा 33.84 टक्के इतकाच शिल्लक आहे. जिल्ह्यात खरीपाची पेरणी 106 टक्के झाली असली तरी पावसाअभावी पीकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका उत्पादकतेवर होणार आहे. सन 2017-18 च्या तुलनेत यावर्षी (2018-19) भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडिद, भूईमुग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आणि कांदा पीकाच्या दरहेक्‍टरी उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील रब्बी पेरणीची टक्केवारीही केवळ 36.77 टक्के एवढी आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


चारा निर्मितीसाठी प्रयोग

पीक उत्पादकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जनावरांसाठी संभाव्य चाराटंचाई भासण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी जिल्हाप्रशासनाने जिल्हाबाहेर चारा विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे, तसेच अतिरिक्त चारानिर्मितीसाठी नियोजन केले आहे. वैरण विकास, हिरवा चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि गवताचे ठोंबे वाटप करण्यात येत आहेत. याशिवाय, आवश्‍यकता भासली तर उसपीकाचा वापर करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2 हजार 682 हेक्‍टरवर मका आणि ज्वारीची पेरणी करून त्यापासून अंदाजे 1 लाख 34 हजार 115 मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. ज्याठिकाणी आवश्‍यकता भासेल तेथे चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्या उघडण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही प्रशासन सज्ज आहे. याशिवाय, जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मदतीने बगॅसचा वापर किंवा गूळ आणि मीठाची प्रक्रिया करून चारा म्हणून वापर करण्याच्या पर्यायाचाही विचार केला जाणार आहे. जलाशयाखाली अथवा तलावाखालील जमिनीवर चारा पीके घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)