दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

राज्यातल्या 151 तालुक्‍यांचा समावेश : राज्य शासनाचे आदेश

पुणे – राज्यातल्या दुष्काळ सदृश 151 तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व उच्च शिक्षण संचालकांना बजाविण्यात आले आहेत.

राज्यातल्या बऱ्याचशा भागांत यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या स्तरातून दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडे अनेकदा तीव्र मागणी करण्यात आली होती. शासनाने अखेर त्याची दखल घेऊन राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्‍यांसाठी विविध योजना व सवलतीही जाहीर केल्या आहेत.

महसूल व वन विभागाकडून राज्यातील 2018-19 च्या खरीप हंगामातील तालुक्‍यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यात परीक्षा फी माफ करण्याचा समावेशही करण्यात आला आहे. राज्यातील टंचाईग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व परीक्षा मंडळाच्या परीक्षांची फी माफ करण्याची योजना लागू केली आहे. यात अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. परीक्षा शुल्क माफीचा निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी संदर्भात शासनाने दिलेल्या निर्णयानुसार तत्काळ कार्यवाही करावी. आवश्‍यकता भासल्यास उच्च शिक्षण संचालकांनी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याबाबत तातडीने शासनाकडे प्रस्तावही सादर करावा, असे आदेश राज्य शासनच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी ह. व्यं. पऱ्हाते यांनी काढले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण संचालक यांना हे आदेश बजाविण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)