दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा- मुख्यमंत्री

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमध्ये डिसेंबरपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, मागेल त्याला शेततळे, पेयजल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आदी विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी कामांना प्राधान्य देऊन दिलेली कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद महसूल विभागात यावर्षी पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. 1355 गावांपैकी 1335 गावांमध्ये 50 पैशांपैक्षा कमी आणेवारी आली आहे. जिल्ह्यात जवळपास 53 दिवस पावसाने खंड दिल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग लवकरात लवकर घेऊन त्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत करणे शक्य होईल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सुरू असलेली जिल्ह्यातील 10,205 घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन लाभार्थींना हक्काची घरे उपलब्ध करुन द्यावीत. शहरी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रात 10 हजार 651 घरांचे उद्दिष्ट तथा शहरी क्षेत्रातील उद्दिष्टेही लवकरात लवकर पूर्ण करावीत. पैठण शहरातील विणकाम करणाऱ्या महिलांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विशेष घरकुल तयार करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे तसेच ठरवून दिलेली उद्दिष्टे संबंधित विभागाने पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या बंधारे दुरूस्तीचे प्रस्ताव पूर्ण करुन अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावी. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावीत याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे बसविणे तसेच नादुरुस्त दरवाज्यांच्या दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

-Ads-

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यात जवळपास 2200 शेततळ्यांची उल्लेखनीय कामे झाली आहे. जिल्ह्यात 10 हजार 208 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून शेततळे योजनेत औरंगाबाद जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक शेततळे केलेला जिल्हा म्हणून राज्यात प्रथम आहे. या कामांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक करुन अशीच कामे इतर तालुक्यातही युद्धपातळीवर हाती घेऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, तसेच पोखरा निधी अंतर्गत अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. जिल्ह्यात शेततळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने फळबागा जिवंत राहण्यास मदत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विभागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेऊन ही कामे वर्षअखेर पूर्ण करावीत. या कामांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच सामाजिक कार्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून आर्थिक व सामाजिक परिणाम याबाबतचा सर्व्हे करण्यात यावा आणि त्याचा अहवाल शासनास सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरींची 1351 कामे पूर्ण झाली आहे. अपूर्ण असलेली तसेच नवीन सर्व कामे लवकरात लवकर करुन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची उद्दिष्टे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आदींची माहिती घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेतील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. मुद्रा कर्ज योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामसडक योजनेअंतर्गत 2015 ते 2018 या वर्षात 760 कि.मी. ची उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी 560 कि.मी. रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली.

विविध विकासकामांमध्ये पिछाडीवर असलेल्या तालुक्यांनी गती घेऊन दुष्काळी परिस्थितीचा उपयोग करुन गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार, शेततळी, ग्रामसडक योजना, आदी महत्वाकांक्षी योजनांची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम मिळेल याकडेही लक्ष द्यावे. डिसेंबर-2018 मध्ये पुन्हा विकास कामांच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे, तोपर्यंत विकास कामांना गती देऊन परिस्थिती सुधारली पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)