संगमनेर : मंत्रालयीन स्तरावरील पथकाने गुरुवारी संगमनेरला भेट देऊन तेथील पाणी टंचाईची माहिती घेतली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले हे पथक संगमनेऱ तालुक्याच्या पाहणीनंतर लगेचच नाशिकला रवाना झाले. पथकाने दौऱ्यात थेट ग्रामस्थांशी संवाद साधत माहिती घेतली. गटविकास अधिकाऱी सुरेश शिंदे यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याचे सांगत त्यांनी येथील कामाचे कौतुक केले.

पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पथकाची स्थापना करण्यात आली. उपसचीव प्र. गि. कानडे, कक्ष अधिकारी सुिनल तुमराम आणि सहाय्यक कक्ष अधिकारी श्रीप्रसाद रेंगे यांचा या पथकात समावेश आहे. हे पथक नाशिक आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत आहे. निवडक गावांना भेटी देतांना पथकाने गुरुवारी संगमनेर खुर्द येथील टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केलेल्या विहीरीची पाहणी केली.

पथक गुरुवारी सकाळी सात वाजताच संगमनेरमध्ये पोहोचले होते. सकाळी लगेचच त्यांनी संगमनेर खुर्द येथे जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी टँकर वेळेवर येतात का, पुरेसे पाणी मिळते का, शौचालयाचा वापर केला जातो का याची प्रत्यक्ष माहिती घेतली. पथकाने थेट ग्रामस्थांशी संवाद साधल्याने ग्रामस्थदेखील आश्चर्यचकित झाले. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, विस्तार अधिकारी वाघमोडे, शाखा अभियंता जगधने, राजू सरोदे आदी त्यांच्यासोबत होते. पथकाने पठार भागातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देत तेथील पाण्यासंदर्भातील उपाययोजनांची नागरिकांकडून माहिती घेतली. रायतेवाडीचे ग्रामविकास अधिकारी राजेश गुंजाळ यांनी पथकातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. पथकाने यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीदेखील समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याने पथकाने येथील कामासंदर्भात समाधान व्यक्त केले.

ग्रामपंचायत विहीर अधिग्रहणाची रक्कम नागरी क्षेत्राच्या दराप्रमाणे मिळायला हवी, अशी मागणी रायतेवाडीचे ग्रामसेवक राजेश गुंजाळ यांनी उपसचीव कानडे यांच्याकडे केली. कानडे यांनी यासंदर्भातील नेमकी अडचण लक्षात घेत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)