दुष्काळी जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा “रास्ता-रोको’

तीन तास आंदोलन झाल्यामुळे वाहतूक ठप्प
पाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यात दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाच्या वतीने करोडी येथे सुमारे तीन तास “रास्ता- रोको’ आंदोलन करण्यात आले .
आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विजय पालवे, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामकिसन शिरसाठ, आम आदमी पक्षाचे संयोजक किसन आव्हाड, स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष विकास नागरगोजे यांनी केले.
शिरसाठ म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून तालुक्‍यात दुष्काळ आहे. चुकीची आणेवारी लावल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली नाही. यावर्षी महसूल विभागाने वस्तुनिष्ठ आकडेवारीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सकारात्मक भावना ठेवावी. तालुका दुष्काळ जाहीर करून खरीप पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी प्रत्येक गावांमध्ये चारा छावण्या सुरु करावी. तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचे भयानक संकट उभे राहिले आहे. सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत.
आव्हाड म्हणाले, शेतकऱ्यांविषयी शासनाचे उदासीन धोरण असल्याने शासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरावे लागेल.पाथर्डी हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. आज अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उसावर हुमणी रोग पडल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. खरिपाचे पीक वाया गेले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. विजय पालवे म्हणाले, पाणी विकत घेऊन शेतकऱ्यांनी जगवलेल्या फळबागा अखेरच्या घटका मोजत आहेत. शासनाने याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. कपाशी, बाजरी, मूग, सोयाबीन, कांदा, आदी खरीप पिके पावसाअभावी जळून गेली आहेत. यापुढे कशी होईल ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जनावरांना चारा आणि पाणी कुठून आणायचा हा प्रश्न आता गंभीर झाला आहे. शासनाने याबाबत ठोस उपाययोजना करायला हवी.यावेळी स्थानिक नागरिकांनीही मनोगते व्यक्त केली.
मुळा व जायकवाडी धरणाचे पाणी संपूर्ण तालुक्‍याला शेतीसाठी मिळावे, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, शासनाने फळबागांचे पंचनामे करून त्वरित अनुदान द्यावे, महागाई नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, हुमणीग्रस्त उसाचे पंचनामे त्वरित करावे, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने इतर कारखान्याप्रमाणे उसाला बाजार भाव द्यावा, मागील वर्षीचे बोंड आळीचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासनाने त्वरित नोकरभरती करावी. अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.
आंदोलनात स्वाभिमानीचे उपाध्यक्ष प्रमोद आंधळे, शरद मरकड, शहराध्यक्ष अमीर शेख, तोहफीक पठाण, करोडीचे माजी सरपंच यसुबा गोल्हार, बाबुराव खेडकर, रामदास खेडकर, महादेव खेडकर, पप्पू खेडकर, गणेश खेडकर, बाळासाहेब भाबड आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.सुमारे तीन तास आंदोलन चालल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज आठवडे बाजार असल्याने पाथर्डी कडे येणाऱ्या बाजारकरूंना आंदोलनामुळे अडकून राहावे लागले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)