दुष्काळी जनता उपाशी… पुरवठा विभाग तुपाशी

माण तालुक्‍यातील अन्न सुरक्षा योजना रामभरोसे : तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी

गोंदवले, दि. 9 (प्रतिनिधी) – माणची जनता दुष्काळाशी सामना करत असताना रेशन दुकानदार आणि पुरवठा विभागाचे अधिकारी मात्र टाळूवरचे लोणी खायला टपून बसले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जनतेसाठी येणाऱ्या अन्नधान्याचा गफला सुरू आहे. दुष्काळी जनता उपाशी अन्‌ रेशन दुकानदार आणि पुरवठा विभागाचे अधिकारी तुपाशी असा लाजीरवाणा प्रकार सुरू आहे. याबाबत तहसीलदारांनी लक्ष घालून योग्य यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे.
राज्यात 2013 पासून अन्न सुरक्षा योजना लागू झाली आहे. तेव्हापासून रेशनिंग दुकानदारांकडील यादी तहसीलदार यांनी मंजूर करण्याच्या कामे लाल फितीत अडकली आहेत. दरवर्षी कितीतरी शिधापत्रिका कमी होत असतात. शिधापत्रिकेत नवीन नावे वाढत व कमी होतात. त्यानुसार दरवर्षी शिधापत्रिका ग्राहक यादीमध्ये बदल होवून तहसील कार्यालयातून धान्य व रॉकेल मंजूर होणे अपेक्षित आहे. परंतु, ज्या आधारे धान्य व रॉकेल मंजूर व वाटप होते तीच ग्राहक यादी वर्षोनुवर्षे तहसीलदारांनी अद्याप मंजूरच केलेली नाही. त्यामुळे माण तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील कारभार आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी झाली आहे.
केसरी कार्डधारकसुद्धा अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी होते हे अनेक ग्राहकांना माहितच नाही. म्हणजेच 2013 पासून म्हणजे 5 वर्षे केसरी कार्ड धारकांच्या धान्याचा गफला संबंधित अधिकारी व रेशन दुकानदार यांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित कार्यालयातील पुरवठा अधिकारी, तपासणी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना प्रत्येक रेशनिंग दुकानदाराकडून 500 ते 1000 रुपयांपर्यंत हप्ते सूरू असल्याची चर्चा आहे. सध्याच्या ऑनलाईन धान्य वाटपात सुद्धा भोंगळ कारभार सुरू आहे. कार्डावरील माणसे व प्रत्यक्ष मशिनवर दिसणारी माणसे यामध्ये तफावत दिसते. ज्यांची एक वेळची चुल पेटत नाही अशा गरजूंना धान्य व रॉकेल मिळत नाही. तपासणी अधिकारी दुकान तपासणी करताना काय बघून दुकान तपासणी करीत होते. तपासणीत त्यांना हा अनागोंदी कारभार दिसला नाही का? नवनिर्वाचित तहसीलदार बी. एस. माने मागील 5 ते 6 वर्षीची तपासणी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गतवर्षी अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांमध्ये बदल केला आहे. ज्या अंध, अपंग, निराधार, गरजू अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना रद्द करून ज्या शिधापत्रिकेमध्ये 7 पेक्षा जास्त माणसे आहेत, अशा कार्डधारकांना अंत्योदय अन्नयोजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यांच्या उत्पन्नाचा पण विचार केला नाही. तसेच ज्यांच्या नावे चारचाकी वाहन नसतानाही अशा लोकांची नावे सधन कुटुंब असल्याचे दाखवून अन्न सूरक्षा योजनेतून कमी केली आहेत. त्यासाठी पुरवठा कार्यालयाने स्थानिक तलाठी व ग्रामसेवक यांना विचारात कसे घेतले नाही असा प्रश्‍न उपस्थित होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)