दुष्काळी उपाययोजनांसाठी कॉंग्रेसचे पालकमंत्र्यांना निवेदन

संगमनेर – यावर्षी संगमनेर तालुक्‍यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी पाणी व चारा, रोजगार हमीचे कामे, यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेसच्यावतीने पालकमंत्री राम शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती निशाताई कोकणे, भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, शंकर खेमनर, बी. आर. चकोर, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, विष्णुपंत राहटळ, सुभाष कुटे, सुहास आहेर, बेबीताई थोरात, प्रियांका गडगे, सुनंदा जोर्वेकर, ऍड. त्र्यंबक गडाख, तात्याराम कुटे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, प्रशासनाला प्रभावी उपाय योजनांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करावी. तालुक्‍यात अतिशय कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, दिवसेंदिवस ही तीव्रता आणखी वाढणार आहे. तरी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी आवश्‍यक पाणी, चारा, टॅंकर मंजुरीसाठी भूजलचे दाखले अट रद्द करावी, प्रलंबित नळ पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर कराव्यात, तळेगाव पाणी योजनेचे बिल माफ करावे, पठार भागातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी शिंदोडी पर्यंत द्यावे, तर सिन्नर तालुक्‍यातील भोजापूर धरणाचे हक्काचे 35 टक्के पाणी निमोण, पळसखेडे, पिंपळे, कर्हे, सोनेवाडी या गावांना द्यावे. अकोले तालुक्‍यातील आढळा धरणातील पाणी जवळे कडलग, राजापूर, निमगाव भोजापूर, चिकणी, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझीरा, धांदरफळ या गावांना महसूल व पोलीस प्रशासनाच्या देखरेखी खाली पुरवावे.
तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये. मनरेगातून तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करावे. त्यासाठी जॉब कार्ड व इतर अटी कमी कराव्या. तालुक्‍यातील सर्व 149 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त लागली आहे. ती कमी करावी, स्वस्त धान्य दुकानांतून धान्य देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)