दुष्काळावर मात करण्यासाठी धार्मिक स्थळांनी पुढाकार घ्यावा

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचे आवाहन : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

पुणे – राज्याच्या अनेक जिल्ह्यांत टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून परिणामी चारा आणि पाणी टंचाईमुळे पशुधनावर परिणाम होणार आहे. यासाठी विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळे आणि सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले आहे.

पुणे येथील विधान भवनामागील अल्पबचत हॉलमध्ये विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी जिल्ह्यांतील चारा छावण्यांच्या नियोजनासंदर्भात चर्चा व योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांची बैठक राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख, धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप,अधीक्षक अभिजित अनाप, के. डी.शिंदे आदी उपस्थित होते.

धर्मादाय आयुक्त डिगे म्हणाले, “राज्यात अनेक धार्मिक स्थळे असून या धार्मिक स्थळांकडे जमा झालेला निधी हा सार्वजनिक कामासाठी व समाजोपयोगी कामासाठी वापरायला हवा. टंचाई भागातील जनतेसाठी या निधीचा उपयोग करावा. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करु त्यांच्यामार्फत धार्मिक स्थळांशी समन्वय ठेवून कामे करू.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने धार्मिक स्थळांच्या मदतीने आतापर्यंत अनेक संकल्पना राबविल्या आहेत. राज्यात डायलिसिस केंद्र सुरू केली आहेत. गणेशोत्सव काळामध्ये पुण्यात “खड्डे बुजवा, जीव वाचवा’ अभियान राबविले. प्रत्येक जिल्ह्यात सामूदायिक विवाह आयोजित केले. गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्याचेही काम या विभागाने केले आहे. चारा छावण्या सुरू कराव्यात आवश्‍यक त्या ठिकाणी अन्नछत्रही सुरु करावे. सध्या राज्यात सर्वत्र टंचाईचे जे काही संकट आहे या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपण सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी एकत्र येवून मदत करावी, असेही आवाहन डिगे यांनी केले.

यावेळी प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांकडून मदतीसाठी प्राप्त झालेले धनादेश डिगे यांनी स्वीकारले. तसेच प्राथमिक स्वरुपात शिरुर तालुक्‍यातील पाबळ येथील दर्शनी प्रतीक रत्नपारखी, अक्षता रामदास रत्नपारखी, हवेली तालुक्‍यातील वाल्हेकरवाडी येथील प्रथमेश सुनील शेलार या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुण्याचे धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप व काही धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनीही आपले व्यक्त केले. प्रास्ताविक धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार अधीक्षक के. डी. शिंदे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)