दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात

पशुधन वाचवण्यासाठी तरूणांचा प्रयत्न : शासन मात्र उदासीन

नीरा- राज्य शासनाने राज्यातील काही जिल्हा व तालुक्‍यात दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न शासनाकडून होताना दिसत नाहीत. अशावेळी काही संस्थांनी पुढाकार घेवून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र, निवडणुकीत अडकलेल्या राजकीय लोकांना व अधिकाऱ्यांना या पशुधनाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने पुरंदर तालुक्‍यात असलेली एकमेव चारा छावनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यातील पुरंदरचा पूर्व भाग व त्याला लागून असलेला बारामतीचा पश्‍चिम भाग हा नेहमीच दुष्काळग्रस्त राहिला आहे. या वर्षीही हा भाग दुष्काळाला तोंड देत आहे. त्यामुळे येथील पशुपालकांना आपले पशुधन जगवणे अवघड झाले आहे. कवडीमोल भावाने विकले जाणारे पशुधन पाहुन येथील युवक सागर जगताप याने भारतीय किसान संघाच्या साह्याने मावडी येथील माळरानावर चारा छावणी सुरू केली आहे.
छावणीत मावडी, नावळी, कोळविहीरे, दौंडज, मुर्टी या भागातून 100 जनावरे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर आणखी 250 जनावरे प्रतीक्षेत आहेत. मात्र, हा खर्च संघटनेला पेलवत नसल्याने आता संघटनेने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ही छावणी आता संकटात सापडली आहे. शंभु सेनेने मदतीचा हात पुढे केला असला तरी तो पुरेसा नाही. यामुळे याछावणीचे भवितव्य आता दानशूर दात्यांच्या कृपाशिर्वादावर अवलंबून आहे.

  • पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न गरजेचे
    शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळत शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी कोणत्याही उपाय योजना राबवल्याचे दिसत नाही. केवळ चारा छावण्याची गरज असल्यास तशी मागणी तहशीलदार यांच्याकडे करावी, असे कोरडे उत्तर दिले जाते. मात्र, आता गावातील सर्वच कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीत अडकल्यामुळे चारा छावण्या उभारण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांना आपले पशुधन कडवी मोलाने विकावे लागणार आहे.
  • शासनाकडून पशुधन वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. अनेकांनी आपली जनावरे कवडीमोल भावात विकली आहेत. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही चारा छावणी सुरू केल्या; परंतु जनावरांची वाढती संख्या व मिळणारी अपुरी मदत यामुळे छावणी चालवणे अवघड होऊन बसले आहे. काही संघटना व दानशूर व्यक्तींना आम्ही यासंदर्भात मदत मागितली आहे. ती मदत मिळाली तर आणखी जनावरे वाचवणे शक्‍य होणार आहे.
    सागर जगताप, छावणी चालक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)