दुष्काळाची झळ ; टॅंकरसाठी १६ प्रस्ताव

पुणे – एन हिवाळ्यातील पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातून टॅंकर सुरू करण्याचे प्रस्ताव येऊ लागले लागले आहेत. आंबेगाव, बारामती, पुरंदर आणि इंदापूर या तालुक्‍यातून 16 प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहता लक्षात येते. हिवाळ्यामध्ये ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची काय स्थिती असू शकते याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे आत्तापासून धरण आणि तलावांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 23 टॅंकर सुरू असून, सर्वाधिक टॅंकर हे बारामती तालुक्‍यात आहेत. एकूण 14 टॅंकरच्या सहाय्याने बारामतीमधील काही गावे आणि वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पुरंदर तालुक्‍यात 3 तर जुन्नर, दौंड आणि शिरूर तालुक्‍यात प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे. एकूण 68 गावे आणि 349 वाड्या – वस्त्यांवरील नागरिकांची तहान टॅंकरद्वारे पुरविली जात आहे. दरम्यान, भविष्यात ही तहान आजून मोठी होणार असल्यामुळे टॅंकरची संख्याही वाढणार आहे.

दरम्यान, नुकत्याच आंबेगाव तालुक्‍यातील मांदळेवाडी आणि दौंड तालुक्‍यातील पांढरेवाडी, रोटी, पडवी आणि वासुंदे या गावांमध्ये टॅंकर सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. तसेच जिल्ह्यातून चार तालुक्‍यातील गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याबाबत एकूण 16 प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्‍यातील वडगाव पीर, पारगांव तर्फे खेड, शिरदाळे, पहाडदरा, लोणी व वाड्या. बारामती तालुक्‍यातील मोंढवे, उडवंडी, कप, खराडेवाडी, मुर्टी आणि वाड्या. इंदापूर तालुक्‍यातील व्याहळी, झगडेवाडी, वकीलवस्ती आणि पुरंदर तालुक्‍यातील राख व वाड्या, वाल्हा व वाड्या, पांडेश्‍वर रोमनवाडी, नावळी या गावांमधून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यात दुष्काळी पार्श्वभूमीवर पाणी आणि जनावारांच्या चाऱ्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठ्याचा कशापध्दतीने वापर करायचे, कोणती काळजी घेतली पाहिजे आणि भविष्यातील दुष्काळाला कसे तोंड द्यायचे याबाबत सर्वांनी आत्तापासून नियोजन करावे.
विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष – जिल्हा परिषद पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)