दुष्काळसदृश स्थितीमुळे ज्वारीचे उत्पादन कमी

वेळ नदी कोरडी ः सातगाव पठार परिसरातील शेतकरी चिंतातुर

– दिलीप धुमाळ

पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागाला दुष्काळाच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली असून विहिरी, नदी, नाले, बोअरवेल हे कोरडे ठणठणीत पडले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे यावर्षी ज्वारीचे उत्पादन कमी निघाल्यामुळे कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भीषण बनू पाहत आहे, त्यामुळे आहे तो ऊस चाऱ्यासाठी आरक्षित करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांना तातडीने चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी सवलतीच्या दरात बियाणे पुरवून सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. भयाण दुष्काळातही उत्तम प्रकारे तग धरून राहिलेली एकमेव वनस्पती वेडीबाभूळ अशा झाडांवर लक्ष देणे, विजेची वाढती गरज, जलसंधारणाचा प्रभावी मार्ग म्हणजे कमी पाण्यावर भरघोस येणारे व दुष्काळातही तग धरणारे पीक, शेतकऱ्यांना योग्य पर्यायी पीक स्थानिक लोकांना रोजगार, औष्णिक वापर, स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. पाण्याचा थेंब ना थेंब वाचला पाहिजे. यासाठी सर्वस्थरातून प्रयत्न आवश्‍यक आहेत. त्यासाठी जलसंधारणवर सुद्धा भर देण्याची आवश्‍यकता आहे. पावसाचे पाणी अडविले पाहिजे. काही ठिकाणी हे पाणी पाझर तलाव, धरण, बंधारे घालून अडविण्यात आले आहे.

  • शेतीसाठी काही उपाययोजना
    – शेतात प्रत्येक जमिनीच्या तुकड्याच्या बाजूला चर (मोठी नाली) खणलेला असतो. या चरातून शेतात पडलेल्या पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाते. या चरांतून जाणारे पाणी मोकळ्या जागेत बंधारे बांधून साठवले जाऊ शकते. शेतात चरांमधून वाहणारे पाणी विहिरीकडे वळवता येऊ शकते. हे पाणी विहिरीत सोडल्यास या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो; पण हे पाणी गढूळ असल्याने जशास तसे विहिरीत सोडता येत नाही, त्यासाठी थोडी जागा करून वाळू, दगड यांचं स्टेप फिल्टर तयार करावं लागतं. म्हणजे गढूळ पाणी विहिरीत पडणार नाही.
  • कृत्रिम तळ्यांची योजना आवश्‍यक
    तुमच्या शेतात तुम्हाला तुमचं स्वतःचं छोटं तळं बनवता येऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला एक जागा करून तिथे तुमच्या गरजेप्रमाणे मोठा खड्डा करावा लागेल. 15 बाय 15 फुटाचा, 5 फुट खोल खड्डा केला तर त्यातून निघालेल्या मातीचा खड्ड्याच्या बाजूंनी गोठ करून घ्यावा म्हणजे त्यातून किमान 1 ते 2 फुट जास्त खोली मिळते. खड्ड्याच्या भिंती गरज पाडल्यास दगड रचून अजून पक्‍क्‍या करता येऊ शकतात. बाजारात अशा प्रकारे पाणी साठवण्यासाठी खास ताडपत्री मिळते. ही ताडपत्री पाहिजे त्या मापाची बनवून मिळते. अशी ताडपत्री खरेदी करून ती बनवलेल्या मोठ्या खड्ड्यात अंथरून ताडपत्री व्यवस्थित बांधून घ्यावी. पाऊस पडेल तेव्हा ते पाणी या कृत्रिम तळ्यात जमा होते. या तळ्यात पाण्याचा पंप बसवून ते पाणी पिकांना देता येते, तसेच तळ्यात मत्स्यपालन देखील होऊ शकते.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)