दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी बीजेएसचे योगदान लाखमोलाचे

पालकमंत्री प्रा.शिंदे ः वॉटर कप स्पर्धेतील नगर जिल्ह्यातील प्रतिनिधींची आढावा बैठक
नगर – ग्लोबल वार्मिंग, वातावरणातील बदल यामुळे पाण्याच्या दुर्भिक्ष्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली आहे. पाणी फौंडेशननेही या कामात योगदान देण्याचे ठरवून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे. बीजेएस या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना जेसीबी, पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून देत आहे. अशा संघटनांचे सहकार्य व लोकसहभाग यातून येणार्या काळात महाराष्ट्र निश्‍चित दुष्काळमुक्त होवून गावे समृध्द झालेली दिसतील, असा विश्‍वास राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतीय जैन संघटनेने वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना जेसीबी, पोकलेनची मदत करण्याचे ठरवून प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. याअंतर्गत नगर जिल्ह्यातील पाच तालुक्‍यातील 314 गावांना मदत देण्याचे नियोजन आहे. या गावांतील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच तालुक्‍यातील अधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषद सभागृहात झाली. या कार्यक्रमावेळी पालकमंत्री प्रा.शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, खा.दिलीप गांधी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, बीजेएसचे जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडिया, सागर गांधी, गिरीश अग्रवाल, योगेश चंगेडिया, केतन बलदोटा, सचिन भळगट, तालुका प्रकल्प समन्वयक प्रवीण चोरडिया, चेतन भळगट, विश्‍वजीत गुगळे, आशिष बोरा, सोमनाथ शेकडे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात वॉटर कप स्पर्धेतील बीजेएसच्या योगदानाबाबत बोलताना शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, भारतीय जैन संघटनेने यावर्षी राज्यातील 75 तालुक्‍यांतील 3 हजार गावांना दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केलाआहे. श्रमदान करणाऱ्या व प्राथमिक टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांना लागलीच पोकलेन, जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यात बीजेएस 32 वर्षांपासून सक्रीय असून सर्व कार्यकर्ते झोकून देवून काम करीत आहेत.नगर जिल्ह्यातील नगर, जामखेड, कर्जत, पाथर्डी व पारनेर तालुक्‍यातील 314 गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून आतापर्यंत जवळपास 45 गावांत प्रत्यक्ष मशिन उपलब्ध करून दिले आहेत. एका चांगल्या कार्यासाठी सर्वजण झटत असून पाणीदार गावांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असा विश्‍वास वाटतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)