दुष्काळनिश्‍चितीसाठी पुन्हा मंडलिनहाय सर्वेक्षण

जिल्हाधिकाऱ्यांचे आ. पिचड यांना आश्वासन; पाहणीही करणार
अकोले – राज्यात व जिल्ह्यात पहिल्यांदाच दुष्काळ जाहीर करताना तालुकानिहाय दुष्काळ जाहीर केलेला आहे. पूर्वी महसूल मंडलग्राहय धरूनच दुष्काळ जाहीर केला जात असे. त्यामुळे आपण पुन्हा महसूल मंडलनिहाय पाहणी व सर्वेक्षण करून दुष्काळ स्थितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आ. वैभवराव पिचड यांच्या शिष्टमंडळास दिले.
जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्‍यात अकोले तालुक्‍याचा समावेश
व्हावा व तालुक्‍यातील विविध प्रश्नांसंदर्भात आज पिचड यांनी शिष्टमंडळासह द्विवेदी यांची नगर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दुष्काळाबाबत चर्चा केली. शासनाने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्‍यांची नावे जाहीर केली. त्यात अकोले तालुक्‍याचा समावेश नाही. अकोले तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती ही चिंतेची बाब असल्याचे आ.पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
या वेळी आ. पिचड म्हणाले, की अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात प्रचंड विषमता आहे. राजूर, शेंडी, साकीरवाडी महसूल मंडलामध्ये प्रचंड पाऊस पडतो, तर समशेरपूर, अकोले, वीरगाव, ब्राम्हणवाडा व कोतूळ या महसूल मंडलामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या महसुली मंडलामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, तरीही तालुक्‍याचा दुष्काळात समावेश नसल्याने ही मंडलेही दुष्काळात घेतली गेलेली नाहीत. तालुक्‍याच्या भौगोलिक परिस्थितीत विषमता आहे. तालुक्‍यात दर 15 किलोमीटरवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बदलत असते. या वर्षी तर तालुक्‍यात उन्हाळयामध्ये सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यासाठी तरी दुष्काळ जाहीर करताना तालुका हा घटक ग्राहय न धरता महसूल मंडल हे घटक ग्राहय धरून महसुली मंडलनिहाय दुष्काळाची बाजू लक्षात घ्यावी.
सध्याच्या स्थितीमध्ये तालुक्‍यातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी, सोयाबीन व भात या पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. भात पीक निसवण्याच्या अवस्थेत असताना पाऊस न पडल्याने मोठया प्रमाणात भाताचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे जीवनमान खालावून तालुक्‍यातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करताना क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवून शासनाकडे शिफारस करावी, असे आ. पिचड यांनी सुचविले.
या वेळी त्यांच्या समवेत जेष्ठ नेते मीनानाथ पांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सचिव यशवंतराव आभाळे, तालुका युवक अध्यक्ष शंभू नेहे, शिवनारायण आभाळे, भास्कर आभाळे, किसन आरोटे, विश्वभंर आरोटे, विठ्ठल खोंड, मारुती खोंड, बाळासाहेब खोंड आदी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)