दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे ! -चंद्रकांत पाटील 

File Photo

संभाव्य पाणी टंचाईबाबत आतापासूनच उपाययोजना करा

कोल्हापूर: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे बोलताना दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगले तालुक्‍यातील कासारवाडी, मनपाडळे,लक्ष्मीवाडी,तारदाळ आणि माले या 5 गावांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट देऊन पिकांची पाहणी केली. तसेच टंचाईबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर तारदाळ येथे आयोजित कार्यक्रमत ते बोलत होते.

-Ads-

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून शासन त्यांना सर्व मदत करेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. ते म्हणाले, पिकांच्या उत्पादनातील घटीची शासनस्तरावर निश्‍चित दखल घेतली जाईल त्यानुसार आवश्‍यक उपाययोजना केल्या जातील मात्र मार्च नंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्‍यता गृहीत धरुन पाणी पुरवठ्यासाठी गावनिहाय वस्तूस्थिती जाणून घेऊन पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला जाईल. गावातील पाणीपुरवठा योजनांचा दर महिन्याला यंत्रणांनी आढावा घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

पावसाअभावी टंचाई सदृश्‍य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्‍यक उपययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून या तालुक्‍यातील प्रत्येकी 5 गावामध्ये मंत्रीमंडळातील सदस्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन शासनास वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील 5 गावांना आज भेट देऊन तेथील टंचाई परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाचही गावात कमी पाऊस झाल्याने पीक उत्पादनात 25 ते 30 टक्क्‌यापर्यंत घट होण्याची शक्‍यता आहे. या सर्व परिस्थितीचा वस्तूनिष्ठ अहवाल यंत्रणेमार्फत घेतला जाईल असेही ते म्हणाले.

टंचाईग्रस्त गावातील पिकांची महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन सर्व्हे करावा, अशी सूचना करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन महिन्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन,भुईमूग, ज्वारी अशा पिकांच्या उत्पादनात होणारी घट याची वस्तुनिष्ठ माहिती कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घेऊन अहवाल तयार करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
संभाव्य काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टिने प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही,याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्‍यातील बहुतांशी सर्वच गावात पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून 25 ते 30 टक्के उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा योजनांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. संभाव्य काळात पाण्याचा तुटवडा पडणार नाही याची यंत्रणांनी काळजी घ्यावी. पाणी पुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

तत्पूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासारवाडी येथे भेट देऊन पावसाअभावी कोमेजलेल्या ज्वारी,भुईमूग, सोयाबीन पिकाची पाहणी केली. कृषी विभागाने पिक काढणीचे प्रकल्प प्राधान्याने घेऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी केली. पावसाअभावी उत्पादनात होणारी घट याचाही अंतर्भाव करण्याची सूचना त्यांनी केली. कासारवाडी, मणपाडळे,लक्ष्मीवाडी, तारदाळ आदी गावच्या सरपंचांनी पाटील यांना आवर्षण आणि शेतीपुढील समस्या सांगितल्या.

“ट्रिगर-2′ लागू 

पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनाना प्राधान्य देण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांचेही नियोजन करण्याची सूचनाही पाटील यांनी केली. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 व यासंदर्भातील शासन निर्णयानुसार दुष्काळ परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने कार्यपध्दती निश्‍चित केली आहे. त्यानुसार ट्रिगर-2 लागू झालेल्या 172 तालुक्‍यामध्ये क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष सत्यमापनाची कार्यवाही शासनाने हाती घेतली आहे. सन 2018 च्या खरीप हंगामात सप्टेंबर 2018 अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार राज्यातील 172 तालुक्‍यात ट्रिगर -2 लागू झालेला आहे. या तालुक्‍यातील 10 टक्के गावे निवडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)