दुषित पाण्यामुळे होणारे विकार

डॉ. राजेंद्र माने

पावसाळा आला की वॉटरबोर्न अर्थात जलजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ होते. हे आजार टाळता येणे सहज शक्‍य असते. मात्र त्यासाठी आपण आवश्‍यक ती काळजीच घेत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे पावसाळा आला की आपण स्वत:वर काही निर्बंध लावून घेणे गरजेचे असते. त्याकडे दुर्लक्ष केले, तर मात्र विविध संसर्गजन्य रोगांची शिकार होणे क्रमप्राप्त ठरते.

गॅस्ट्रो
दूषित पाण्यामुळे उलटी व जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे शरीर कोरडे पडू शकते. शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो.
प्रसार
दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो. उदा. एकाच ओढ्याचा कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरांना धुणे इ. साठी वापर केला तर, त्याचप्रमाणे उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता, तसेच न झाकलेले पाणी पिणे म्हणजेच स्वच्छतेचा अभाव, असल्यामुळे गॅस्ट्रोची लागण व प्रसार होतो.
लक्षणे
पोट दुखणे व वारंवार पातळ संडास होणे.
उलटी होणे. लहान मुलांची टाळू खोल जाने, डोळे खोल जाणे.
तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे.
लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
उपाययोजना
पाणी उकळून व गाळून पिणे.
घराच्या परिसरातील स्वच्छता राखणे.
शौचाला जावून आल्यानंतर हात साबणाने धुणे.
जलसंजीवनी देणे. याने फरक न पडल्यास दवाखान्यात दाखवावे.
इतर उपाय योजना
गावातील पाणीपुरवठा योजनेची नियमित पाहणी करणे. गावातील मुख्य टाकी नियमित धुवून स्वच्छ करणे. मुख्य पाईपलाईन ते टाकीपर्यंत पाईपलाईन मध्ये गळती आहे का ते पाहणे. टाकीवर नेहमी झाकण आहे का ते पहावे. पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ असावा. शक्‍यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टी.सी.एल. टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे; परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कावीळ
दूषित पाणी तसेच अन्नपदार्थामधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते. परंतु स्वच्छतेच्या काही सवयी लावून घेतल्या तर काविळीपासून दूर राहता येते. कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. कावीळ ही दूषित सुया कावीळ झालेल्या माणसाचे रक्त यातूनही कावीळ पसरू शकते. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.
लक्षणे
सुरुवातीला थोडा ताप येतो.
भूक कमी होते.
मळमळ व उलट्या होतात.
लघवी गडद पिवळी होऊ लागते.
डोळे पिवळे दिसू लागतात.
बऱ्याच वेळा पोटाच्या वरच्या भागात दुखते. काही जणांच्या अंगाला खाज सुटते.
प्रतिबंधात्मक उपाय –
गरोदर स्त्रियांना हा आजार झाल्यास त्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागते. हा आजार होऊ नये यासाठी गरोदर स्त्रिया तसेच इतरांनीही काही सूचनांचे काटेकोर पालन करावे.
पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. पाणी 15 मिनिटे उकळून प्यावे.
बाहेरच्या ठिकाणी पाणी पिताना काळजी घ्यावी
घरी तयार केलेले ताजे पदार्थच खावेत. उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ टाळावेत.
रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ- कापलेली फळे, शीतपेय, पाणीपुरी, भेळ हे सर्व बनवताना स्वच्छ पाण्याचा वापर केला नसल्यास तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवली नसल्यास या पदार्थांमधून काविळीचे विषाणू पसरू शकतात. विशेषतः गरोदर स्त्रियांना हे पदार्थ आवडत असल्यास ते खाण्याची तीव्र इच्छा होते. मात्र रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
पावसाळ्याच्या दिवसात फळे तसेच सलाडसाठी कंदमुळे, गाजर, बीट व्यवस्थित धुवून घ्यावेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. तसेच परिसरही स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. गरोदर स्त्रियांना ही लक्षणे पहिल्या तीन महिन्यानंतर दिसून आल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
कावीळ होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी-
परिसर स्वच्छ ठेवावा.
पिण्याचे पाणी शुद्ध व स्वच्छ असावे.
पिण्याच्या पाण्याजवळ धुणे-भांडी करणे, गुरांना धुणे, शौचाला बसणे तसेच सांडपाणी वाहू देणे अशा गोष्टी टाळाव्यात.
शौचाहून आल्यावर तसेच काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने धुवावेत.
अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.
फळे व भाज्या खाण्याआधी धुवून घ्याव्यात.
विनाकारण इंजेक्‍शन व सलाईन घेणे टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)