अग्रलेख | दुर्लक्षित अण्णा !

अण्णांविषयी वाद प्रवाद काहीही असोत, पण त्यांनी ज्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले आहे त्या मागण्या अयोग्य आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मोदी सरकार स्वत:ला भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणवून घेते मग त्यांना लोकपाल नियुक्‍त करायला चार वर्षात का सवड मिळाली नाही हा प्रश्‍न उपस्थित होतोच. लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही ही फार बोगस सबब आहे. घटनात्मक पदांवरील अन्य व्यक्‍तींच्या निवडीसाठीही विरोधी पक्षनेत्यांची गरज असते, मग यातील किती नेमणुका सरकारने थांबवल्या हाही प्रश्‍न विचारावा लागेल.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील उपोषणाला पाच दिवस होऊन गेले आहेत. त्यांच्या या आंदोलनाकडे अद्याप सरकारने म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. सन 2011 साली दिल्लीत ज्या मैदानावर अण्णांनी उपोषण करून सारा देश हादरवून सोडला होता, त्याच मैदानावर त्याच विषयावर अण्णांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले असले तरी या आंदोलनाकडे केवळ सरकारच नव्हे तर मीडियाचेही साफ दुर्लक्ष झाले आहे. सन 2011 च्या आंदोलनात मीडियाने अण्णांना खऱ्या अर्थाने महानायक बनवले होते. त्यामुळे वातावरण तापण्यास मोठी मदत झाली होती. देशभर भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी जागृती झाली.

गावोगावी अण्णांच्या आणि लोकपालाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. वातावरण इतके तापले की त्यावेळच्या सरकारला लोकपालाच्या नियुक्‍तीबाबत लोकसभेत सहमतीची हमी द्यावी लागली होती. त्यानुसार पुढे रितसर व्यापक चर्चा होऊन लोकपाल कायदा प्रत्यक्षात आला आणि लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे कायदा होऊनही लोकपालाची नियुक्‍ती होऊ शकली नव्हती. नव्याने येणाऱ्या सरकारवर त्याच्या नियुक्‍तीची जबाबदारी पडली होती. पण नव्याने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने लोकपालाला रितसर वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही म्हणून लोकपालांची निवड करता येत नाही असे तकलादू कारण देऊन मोदींनी लोकपाल बासनात गुंडाळून ठेवला. लोक आता प्रश्‍न विचारतात की, मग चार वर्षे अण्णा गप्प का बसले. पण वस्तुस्थिती अशी आहे की अण्णा अगदीच गप्प बसले होते असे नव्हे. सुरुवातीचा काही काळ त्यांनी सरकारला मुद्दाम वेळ देऊ केला होता. पण नंतर मात्र वारंवार मोदींना पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा त्यांनी सुरूच ठेवला होता. अण्णांनी मोदींना आजपर्यंत चाळीसहून अधिक पत्रे पाठवली आहेत. पण त्यांच्या एकाही पत्राला उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच अण्णांना पुन्हा उपोषणास्त्र उपसावे लागले आहे.

सरकारने अण्णांचे आंदोलन हाताळायची जबाबदारी सध्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरच सोपवलेली दिसते आहे. अमित शहा यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील एक मंत्री गिरीश महाजन यांना दिल्लीत बोलावून त्यांना अण्णांशी चर्चा करण्यास धाडले; परंतु त्या चर्चेतून अद्यापपर्यंत तरी काहीही निष्पन्न झालेले नाही. केंद्र सरकारकडून लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, अशी खमकी भूमिका अण्णांनी घेतल्यामुळे आता मोदी सरकार यातून कशी वाट काढणार हे पाहावे लागेल.

अण्णांविषयी वाद प्रवाद काहीही असोत, पण त्यांनी ज्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले आहे त्या मागण्या अयोग्य आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मोदी सरकार स्वत:ला भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणवून घेते मग त्यांना लोकपाल नियुक्‍त करायला चार वर्षात का सवड मिळाली नाही हा प्रश्‍न उपस्थित होतोच. लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही ही फार बोगस सबब आहे. घटनात्मक पदांवरील अन्य व्यक्‍तींच्या निवडीसाठीही विरोधी पक्षनेत्यांची गरज असते, मग यातील किती नेमणुका सरकारने थांबवल्या हाही प्रश्‍न विचारावा लागेल.

लोकसभेत विरोधी पक्षनेता नसताना सीबीआयचे प्रमुख निवडले जाऊ शकतात तर लोकपाल नियुक्तीला काय अडचणी होती, या प्रश्‍नाचे उत्तर मोदींना द्यावे लागेल. लोकपालाला जोडूनच अण्णांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्‍नही हाती घेतले आहेत. तेही महत्त्वाचेच आहेत. सन 2011 च्या आंदोलनाइतका प्रतिसाद अण्णांना यावेळी मिळाला नाही म्हणून त्यांचे आंदोलन कमी महत्त्वाचे ठरत नाही. अण्णांना यावेळी पूर्वी इतका पाठिंबा का मिळाला नाही यालाही काही कारणे आहेत. त्यात सरकारी पातळीवरून करण्यात आलेली गळचेपी हे जसे एक मुख्य कारण आहे तसेच स्वत: अण्णाही त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहेत हेही मान्य करावे लागेल. त्यांनी आपल्या आंदोलनापासून सर्वच राजकारण्यांना जसे दूर ठेवले आहे तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अन्य नेत्यांनाही त्यांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाला मर्यादा आल्या.

या आधीच्या त्यांच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर केजरीवाल, शांती भूषण, किरण बेदी, मनीष सिसोदिया यांच्यापासून ते थेट रामदेवबाबा, श्रीश्री रविशंकर अशा मोठ्या हस्ती उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला मोठे वजन प्राप्त झाले होते. त्यावेळी दिल्लीच्या वातावरणात अण्णा नवीन होते तरी त्यांच्याकडे असलेली नैतिक ताकद मोठी होती. त्यामुळे त्यांची तुलना महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण यांच्याशी केली गेली. तथापि, मधल्या सात वर्षाच्या काळात स्वत: अण्णांनी अनेक उलटसुलट भूमिका घेतल्याने त्यांचा दिल्लीतील धाक कमी झाला. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आता पुन्हा नवीन सहकारी जमवून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

अण्णा राजकारणी नाहीत. त्यांच्या स्वभावाविषयी किंवा लहरीपणा विषयी कोणाचा आक्षेप असू शकेल पण त्यांच्या नैतिकतेविषयी किंवा हेतूविषयी कोणाला शंका घेता येणार नाही. अण्णांच्या मागची गर्दी कमी झाली असेलही पण त्यांच्या मागण्यांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. त्यामुळे लोकपाल नियुक्‍तीविषयी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी मोदी सरकारला काही तरी ठोस भूमिका निश्‍चितपणे घ्यावीच लागेल.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला श्री अण्णा ज्या कारणासाठी आज उपोषणाला बसले आहेत व ह्या आधी सुद्धा kami-अधिक प्रमाणात त्यांनी केलेल्या उपोषणाची फहलश्रूती लोकांनी अनुभवली आहे त्याच प्रमाणे राजकीय पक्ष जेव्हा विरोधात असतो तेव्हा त्यांची आंदोलने सुद्धा ह्याच कारणासाठी झालेली आहेत व आजही पाहावयास मिळत आहेत हि आंदोलने करणारे राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत येतात तेव्हा रीतसर त्यांनी केलेल्या ह्या मागण्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात ह्याची सुद्धा आता लोकांना जाणीव झाली आहे अण्णांचे दिल्लीतील उपोषण यशस्वी होण्यामागील मुख्य कारण कि एक नवी व्यक्ती ह्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून लोकांचा प्रतिसाद मिळाला होता परंतु त्यांनी सर्व समस्यांवरील उपोषणाचा अंगिकारलेला एकमेव उपाय ह्यातील फोलपणा लोकांच्या नजरेत आल्यानेच मुंबईतील त्यांचे उपोषण फ्लॉप झाले हाही अनुभव जनतेने पहिला प्रश्न एका मार्गाने सुटतनाही तेव्हा ते सोडविण्यासाठी इतर मार्ग चोखाळावे लागतात तसा प्रयत्न होताना दिसत नसल्यानेच लोकांचा प्रतिसाद मिळत नाही हे सत्य नाकारता येणार नाही त्या कारणानेच गोंधळात नव्या गोंधळाची भर पडणार एव्हडेच असे लोकांचे मत झाले असल्यानेच आणा दुर्लक्षित होण्याची श्यकता नाकारता येईल का ? आता सरकार ह्यावरील तोडगा काढण्यासाठी त्यांच्या जीवाची काळजी हि सबब समोर करून उपचारासाठी लंडनला पाठवून देतील परीकारांवर आज तिथे उपचार होत आहेतच ह्या पद्धतीने हा प्रश्न सोडविण्याची श्यकता नाकारता येईल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)